अतूल शिनगारे
धारूर : तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती तलावात शनिवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर एका महिलेसह अन्य दोघींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे हिंगणी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जोडहिंगणी (ता. धारूर) येथील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या पारवे कुटुंबातील महिला व सहा मुली शनिवारी (दि. १६ मे) सकाळी सरस्वती तलावावर गेल्या होत्या. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास काही मुली तलावात चप्पूच्या सहाय्याने पाण्यात फिरत असताना अचानक चप्पू पलटी झाला. यामध्ये पलक श्याम पारवे (वय १४ वर्षे), दिव्या विकास कांबळे (वय ९ वर्षे) आणि मोहिनी भीमा पारवे (वय १६ वर्षे) या तिघी पाण्यात पडल्या. तलावाच्या काठाजवळ असलेल्या जान्हवी कोंडीराम पारवे (वय १० वर्षे), तन्वी कोंडीराम पारवे (वय ८ वर्षे), माधवी शाम पारवे (वय १७ वर्षे) तसेच माया मालाजी शिंदे (वय ३० वर्षे) यांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली. आवाज ऐकून जवळच मासेमारी करत असलेले धनराज पारवे व त्यांची पत्नी बिटुबाई धनराज पारवे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेत मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला.
स्थानिकांच्या मदतीने पाण्यातील मुलींना बाहेर काढण्यात आले. यामध्ये पलक पारवे, दिव्या कांबळे, मोहिनी पारवे तसेच त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या माया मालाजी शिंदे या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. सर्वांना तत्काळ मोहखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र उपचारासाठी नेत असताना पलक श्याम पारवे (रा. हिंगणी) व दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी) यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. माया मालाजी शिंदे यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तर मोहिनी पारवे हिला दिंद्रुड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, मृत मुलींच्या पार्थिवांवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पलक पारवे हिच्यावर हिंगणी येथे, तर दिव्या कांबळे हिच्यावर कासारवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हिंगणी व परिसरातील नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.