बीड

Beed Crime News : कोयत्याने वार करून जबरी चोरी करणारी टोळी पकडली

दोन गुन्हे उघड; मुद्देमालही केला जप्त; एलसीबीची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

Beed Crime News: Gang committing armed robbery using sickles apprehended

बीड, पुढारी वृत्तसेवा : पाटोदा तालुक्यात कोयत्याने वार करून जबरी चोरी करणाऱ्या तसेच घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील मोबाईल, रोख रक्कम, टीव्ही, सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी राजेंद्र अभिमान नागरे (वय ४१, रा. थेरला, ता. पाटोदा) हे मोटारसायकलवरून बीडहून गावी जात असताना रोहतवाडी शिवारात सायंकाळी साडेसातच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी त्यांची मोटारसायकल अडवली. आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतली आणि कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच दिवशी आरोपींनी थेरला फाटा परिसरातील सीताबाई महादेव सोनवणे यांच्या घरासह 'संतकृपा' चहापान हॉटेलमध्ये चोरी केली. या घरफोडीत टीव्ही, मोबाईल, सोन्या चांदीच्या वस्तूंसह सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणीही पाटोदा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.

तपासादरम्यान माऊली नामदेव पवार (वय २६), मयूर ऊर्फ ओमकार नितीन भोसले (वय २२) आणि आदित्य ऊर्फ बाळा सिद्ध पवार (वय १९, सर्व रा. इंदापूर, जि. पुणे) यांनी हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने इंदापूर येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील मोबाईल, रोख रक्कम, टीव्ही, सोन्याच्या मौल्यवान वस्तू तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील कारवाईसाठी पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक औदुंबर मस्के करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि श्रीराम खटावकर तसेच एलसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT