Beed Crime News: Assault during Bailpola procession; injured person dies
पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा: बीड तालुक्यातील अंथरवण पिंप्री येथे बैलपोळ्यादिवशी मारामारीची घटना घडली होती. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवर संभाजीनगर येथे उपचार सुरु असतांना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह पिंपळनेर पोलिस ठाण्यात आणून आरोपींच्या अटकेची मागणी केली होती, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर बुधवारी मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
बबन गुलाब पवार (वय 43, रा. अंथरवन पिंप्री तांडा, ता. जि. बीड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बैलपोळ्याच्या दिवशी बैल मिरवणुकीदरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या घटनेत बबन पवार गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू होते.
मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांनी नातेवाईकांशी संवाद साधला. संबंधित मारहाणीच्या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे.