

Maske, who left Shivsangram and the BJP, is reportedly unhappy within the NCP as well
उदय नागरगोजे
बीड : शिवसंग्राम, भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करत जिल्हाध्यक्ष झालेले राजेंद्र मस्के नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच ते राष्ट्रवादीलाही सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुरुवारी बीडमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मोर्चालाही ते अनुपस्थित होते, यावर आ. रोहित पवारांनीही पद मिखण्यासाठी नसते तर काम करण्यासाठी असते असे म्हणत नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत दुष्काळ प्रश्नावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आ. संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु बीडमध्ये मोर्चा असतांना जिल्हाध्यक्षांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना खटकत होती. गत काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चाही होत होती, याच कारणातून ते अनुपस्थित होते की काय, असे बोलले जात आहे.
विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे स्व.आ. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राममध्ये सक्रीय होते. स्व. मेटे यांनी त्यांना शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष, युवकचे प्रदेशाध्यक्ष केले होते. याबरोबरच मस्के यांच्या पत्नी जिल्हापरिषद सदस्य तसेच उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. यादरम्यानच्या काळात त्यांनी शिवसंग्राम सोडण्याचा निर्णय घेत भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश झाल्यानंतरही त्यांनी जिल्हाध्यक्षपद मिळवले, स्व.आ. विनायक मेटे यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले मस्के पुढे मंत्री पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाऊ लागले. भाजपात असतांना त्यांनी घेतलेल्या बैलगाडा स्पर्धेवेळी तर मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांची बीड विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी देखील जाहीर केली होती.
परंतु बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवानंतर समीकरणे बदलली. विशेषतः ज्या बीड विधानसभा मतदारसंघातून मस्के निवडणूक लढवू इच्छुक होते, त्याच ठिकाणाहून पंकजा मुंडे यांना अतिशय कमी मिळाल्याने मस्केंवरील नाराजी वाढली. हे लक्षात घेत लोकसभा निवडणूकीत बीडमध्ये आणि राज्यात यश मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय मस्केंनी घेतला होता. परंतु विधानसभा निवडणूकीत राज्यात महायुतीचे सरकार आले.
त्यानंतरही मस्के यांनी आ. संदिप क्षीरसागर, खा. बजरंग सोनवणे यांच्याशी जुळवून घेत राजकीय वाटचाल सुरु ठेवली. परंतु गत काही महिन्यांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात नाराज असल्याची चर्चा होत होती. यावर गुरुवारच्या मोर्चामध्ये शिक्कामोर्तबच झाल्याचे दिसते. आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चात जिल्हाध्यक्षच अनुपस्थित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत होती. याच विषयावर आ. रोहित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता, जिल्हाध्यक्ष कोठे आहेत हे मला माहिती नाही, काल आले होते. पद हे जनतेच्या प्रश्नावर काम करण्यासाठी असते, मिरवण्यासाठी नसते असे म्हणत नाराजी व्यक्त केल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.
मस्केंच्या निर्णयाकडे लक्ष
बीड विधानसभा मतदारसंघात चर्चेत असलेला चेहरा म्हणून राजेंद्र मस्केंची ओळख आहे. परंतु आजवरची त्यांची राजकीय वाटचाल सातत्याने पक्ष बदलणारे नेते म्हणून झाली आहे. शिवसंग्राम, भाजपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जिल्हाध्यक्ष असताना ते नाराज असल्याने त्यांची पुढील राजकीय 'घडी' कशा पद्धतीने ते बसवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.