गौतम बचुटे
केज : एका ऊसतोड मजुराच्या तेरा वर्ष अकरा महिने वयाच्या एका ऊस तोड मजुराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी आणि तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही गरोदर असल्याची माहिती उघडकीस आली.
या बाबतची माहिती अशी की, सन २०२५ ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या ऊस हंगामात धारूर तालुक्यातील युसुफवडगाव तालुका केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी ही तिघे गावातील ऊसतोड मुकादम यांच्याकडून उचल घेऊन त्यांच्यासोबत कर्नाटक राज्यातील बागलपूर जिल्ह्यातील मूधुळच्या रण साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या गावातील एका कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुले हे देखील सोबत ऊसतोडणीसाठी गेले होते. त्यानंतर जानेवारी २०२६ रोजी गावातील ग्रामदैवत म्हसोबा यात्रेनिमित्त गावी आले होते. ७ जानेवारी २०२६ रोजी देवदर्शन करून घरी परत आल्यानंतर त्यांची अल्पवयीन मुलगी घरी आढळून आली नाही. त्यांनी तिचा शोध घेतला असता अल्पवयीन मुलीचे रोहन अर्जुन समुद्रे यांनी अज्ञात कारणासाठी तिचे अपहरण केल्याचे समजले.
मुलीच्या नातेवाईकांनी रोहन समुद्रे यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता मुलीला परत आणून ताब्यात देण्याचे अपहरण करणाऱ्या मुलाच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर दि. २३ एप्रिल २०२६ रोजी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अपहरणकर्ता रोहन अर्जुन समुद्रे यांच्यासह त्याचे आई- वडील आणि भाऊ यांच्या विरुद्ध अज्ञात कारणासाठी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार रोहन शंकर समुद्रे, अर्जुन शंकर समुद्रे, करण अर्जुन समुद्रे, आणि मीरा अर्जुन समुद्रे या चौघांविरुद्ध गु र नं १०८/२०२६ भा. न्या. सं. १३७(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार छाया वाघमारे या करीत होत्या.
दरम्यान युसुफवडगाव पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून रुजु झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांनी या प्रकरणी सखोल माहिती काढली. त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत अशी माहिती मिळाली की, रोहन समुद्रे हा युवक त्या अल्पवयीन मुलीसोबत पुणे जिल्ह्यातील चाकण येथे राहत आहे. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या आदेशावरून पोलिस कर्मचारी केशव खाडे यांनी दि. २२ ऑगस्ट रोजी अत्यंत शिताफीने आणि गुप्त पद्धतीने पुणे येथे पाठवून तपास घेतला. त्यावेळी रोहन समुद्रे हा त्या अल्पवयीन मुलीसोबत चाकण परिसरात एका खोलीत राहत असल्याचे आढळून आला. पोलिस कर्मचारी केशव खाडे यांनी त्या दोघांना सोबत घेऊन युसुफवडगाव पोलिस ठाण्यात घेऊन हजर झाले. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके हे पुढील तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती
अपहरणकर्ता तरूणाने अल्पवयीन मुलीला धाक दाखवून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार व शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती अल्पवयीन मुलगी ही गरोदर असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
अपहरणकर्त्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पोक्सो गुन्ह्या दाखल
रोहन समुद्रे आणि त्याचे आई वडील व भाऊ यांच्यावर पूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता मुलीला ताब्यात घेऊन तिच्या जबाबवरून आणि वैद्यकीय तपासणीच्या अहवालावरून रोहन समुद्रे यांच्यासह तिघांविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.