Beed Crime News : बीडमध्ये मनी म्यूल खात्यांचे रॅकेट; एकाच खात्यात तब्बल २३ कोटी जमा

२५ जणांच्या तक्रारींची नोंद; चार खातेधारकांवर गुन्हा दाखल
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

Money Mule Accounts Racket in Beed; 23 crores accumulated in a single account

बीड, पुढारी वृत्तसेवा : सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारून ती पुढे वळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'मनी म्यूल' बँक खात्यांचा बीड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विविध बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बीड सायबर पोलिस ठाण्यात संबंधित चार खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 12 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला.

Cyber Fraud
Firing Case : बीड शहरात किरकोळ वादातून गोळीबार

बीडमधील एका डीसीबी बँक खात्यात 8 सप्टेंबर 2025 ते 15 एप्रिल 2026 या कालावधीत तब्बल 23 कोटी 73 लाख 31 हजार 665 रुपये जमा झाले. त्यापैकी 23 कोटी 70 लाख 31 हजार 665 रुपये काढण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. या खात्याविरुद्ध राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तब्बल 25 तक्रारी नोंद झाल्या आहेत.

याशिवाय बैंक ऑफ महाराष्ट्रच्या नगर रोड शाखेतील एका खात्यात 3 लाख 7 हजार 169 रुपये जमा होऊन त्यापैकी 3 लाख 7 हजार 123 रुपये काढण्यात आले. या खात्याविरुद्ध दोन तक्रारी आहेत. आयडीबीआय बँकेच्या मोंढा रोड शाखेतील आणखी एका खात्यात 2 कोटी 6 लाख 8 हजार 224 रुपये जमा होऊन त्यापैकी 2 कोटी 5 लाख 82 हजार 538 रुपये काढण्यात आले. या खात्यावर तीन तक्रारी नोंद आहेत. त्याच शाखेतील दुसऱ्या खात्यात 9 लाख 86 हजार 542 रुपये जमा झाले असून त्यापैकी 9 लाख 22 हजार 135 रुपये काढण्यात आले. या खात्याविरुद्धही तीन तक्रारी नोंद असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Cyber Fraud
Shravan masarambh 2026 : रुद्राभिषेकाने वैद्यनाथनगरीत श्रावणपर्वाला सुरुवात

विविध कलमांन्वये गुन्हा

बीड सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 112(2), 317 (2), 61(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या नोंदणीखाली सुरू करण्यात आला आहे. सायबर फसवणुकीची रक्कम स्वतःच्या खात्यात स्वीकारणे किंवा पुढे वळविण्यासाठी खाते उपलब्ध करून देणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण ठरू शकते. या प्रकरणातील संशयितांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.

सायबर गुन्हेगारीच्या संघटित रॅकेटचा संशय

पोर्टलवरील मनी ट्रेलच्या विश्लेषणातून फसवणुकीची रक्कम या बँक खात्यांमध्ये प्राप्त झाल्यानंतर ती इतर खात्यांमध्ये वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले. सायबर फसवणूक करणारे आरोपी वेगवेगळ्या भागांत 'फिल्ड एजेंट' नियुक्त करून पीडितांना विविध आमिषे दाखवतात आणि फसवणुकीची रक्कम मिळविण्यासाठी अशा खात्यांचा वापर करतात. माहितीनुसार, या खात्यांचा वापर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारणे, तिचे 'लेअरिंग' करणे आणि पुढे हस्तांतरित करण्यासाठी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित खातेधारकांचा सायबर गुन्हेगारीच्या संघटित नेटवर्कशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

एपीके फाईल्स धोकादायक !

सायबर फ्रॉड करणारे लोक वेगवेगळ्या शासकीय नावांनी एपीके फाईल्स पाठवतात. त्या डाऊनलोड केल्यास मोबाईलचा अॅक्सेस सायबर भामट्यांकडून जातो. यातून क्रेडीट कार्ड, युपीआय आदि माहिती त्यांच्याकडे जाते, खात्यातील पैसे डायरेक्ट डेबीट होतात. त्यानंतर हे पैसे पहिल्या अकाऊंटवरुन दुसऱ्या, दुसऱ्या अकाऊंटवरुन तिसऱ्या अकाऊंटवर जातात अशी मोठी साखळी अशा खात्यांची तयार करतात आणि यातील कोणीतरी एकजण पैसे काढून घेतो. बँक खाते भाड्याने देवून त्यापोटी ठराविक रक्कम घेण्याचा हा सर्व प्रकार असून बीडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता यात सहभाग असलेल्या मंडळींचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news