

अतुल शिनगारे
धारूर: तालुक्यातील पिंपळवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांजरकडा तांडा येथे भावाचा सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या भावावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात राजाभाऊ भगवान तिडके गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
मांजरकडा तांडा येथे बाबासाहेब भगवान तिडके यांचा सचिन अशोक जाधव यांच्यासोबत वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी बाबासाहेब तिडके यांचे भाऊ राजाभाऊ भगवान तिडके घटनास्थळी गेले होते. यावेळी सचिन जाधव व अशोक जाधव यांनी राजाभाऊ तिडके यांच्या डोक्यात दगड मारल्याचे सांगण्यात येत आहे.
दगडाचा मार लागल्याने राजाभाऊ तिडके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र घुगे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून घटनेचा तपास सुरू केला आहे. वादाचे नेमके कारण तसेच घटनेतील इतर बाबींचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेमुळे मांजरकडा तांडा परिसरात खळबळ उडाली आहे.