Beed Ambajogai land deal dispute
अंबाजोगाई : जमीन खरेदी व्यवहारातील आर्थिक तणावामुळे अंबाजोगाई शहरातील व्यवसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल न झाल्यास अंत्यविधी न करण्याचा पवित्रा मृताच्या कुटुंबीयांनी घेतल्याने, सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला. मंगळवारी (५ ऑगस्ट) मृताचा अंत्यविधी करण्यात आला. या घटनेमुळे अंबाजोगाईत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फातेमा शेख (वय ४०, रा. गांधी नगर, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती जावेद अली शेख यांचा मृत्यू सहव्यावसायिकांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे झाला. जावेद अली शेख यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. २८ जुलै २०२३ रोजी त्यांनी हमीद मुस्तफा खान (रा. रिसोड, जि. वाशिम) यांच्याकडून २० एकर १९ गुंठे जमीन सुमारे २४ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारात अंबाजोगाईतील जलील नियाजोद्दिन शेख, शोएब आयुब कुरेशी, जिलानी बशीर कुरेशी, अनुप ललितमोहन जाजु, कुलदीप किशोर परदेशी, ईजाज फतरू अली आणि फेरोज अब्दुल सत्तार सहभागी होते. व्यवहारात जमिनीचे एन.ए. (नॉन-अॅग्रिकल्चरल) रूपांतर दोन महिन्यांत करण्याचे ठरले होते. मात्र, ठरलेल्या वेळेत रूपांतर न झाल्याने भागीदारांमध्ये वाद निर्माण झाले.
या पार्श्वभूमीवर शोएब कुरेशी व अनुप जाजु यांनी जावेद शेख यांना वारंवार फोन करून धमक्या दिल्या, असे फातेमा शेख यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे जावेद शेख यांनी माजेद इनामदार यांची अंदाजे ३ कोटी रुपयांची जमीन शोएब कुरेशी व अनुप जाजु यांच्याकडे तारण म्हणून ४ जानेवारी २०२५ रोजी नोटरी करून दिली होती.
रविवारी (३ ऑगस्ट) रात्री १० वाजता राजीव गांधी चौकातील सुदर्शन धोत्रे यांच्या कार्यालयात प्रॉपर्टी संदर्भात बैठक झाली. बैठकीला जावेद शेख, शोएब कुरेशी, अनुप जाजु, माजी नगरसेवक दिनेश भराडिया, सचिन जाधव, सुदर्शन धोत्रे व वसीम कुरेशी उपस्थित होते. या बैठकीत जावेद शेख यांना शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देत तारण ठेवलेल्या मालमत्तेची नोंदणी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या वादामुळे जावेद शेख यांना तीव्र तणाव व घाम येऊ लागला. छातीत कळ येत असल्याचे त्यांनी सांगितले आणि रुग्णालयात नेण्याची विनंती केली. अखेर वसीम कुरेशी यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
फातेमा शेख यांच्या तक्रारीवरून शोएब कुरेशी, अनुप जाजु, माजी नगरसेवक दिनेश भराडिया, सचिन जाधव आणि सुदर्शन धोत्रे या पाच जणांविरुद्ध बीएनएस कलम १०५, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे करत आहेत.