Ashti child marriage
कडा : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तसेच ग्राम बाल संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मंगळवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत संबंधित ग्रामसेवक, नातेवाईक आणि काही ग्रामस्थ पोलीस चौकीत उपस्थित असतानाही गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक आणि कायदेशीर गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असते. मात्र, तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारवाईला नेमका विलंब का झाला, कोणत्या कारणामुळे प्रक्रिया रखडली आणि संबंधित यंत्रणेने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
ग्राम बाल संरक्षण समितीवर बालविवाह रोखण्यासोबतच अशा प्रकारांची माहिती प्रशासन आणि पोलिसांना देण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. असे असताना एकाच रात्री तीन बालविवाह झाल्याचे समोर आल्यानंतरही लेखी तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या विलंबामागे कोणाचा दबाव होता का किंवा प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष झाले का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
बालहक्क कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी संबंधित कुटुंबीय, विवाह लावून देणारे मध्यस्थ तसेच या प्रकाराला मदत करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाबाबत कानडी बुद्रुकचे ग्रामसेवक एम. ए. माळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “घटनास्थळी पंच वेळेवर हजर नसल्यामुळे मंगळवारी गुन्हा दाखल करता आला नाही. आज घटनास्थळाचा रीतसर पंचनामा पूर्ण करून या तीनही बालविवाह प्रकरणांत दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.”
दरम्यान, प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणात प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे कानडी बुद्रुकसह संपूर्ण आष्टी तालुक्याचे लक्ष लागले आहे.