

बीड : बीड जिल्हा भाजपच्या अल्पसंख्याक कमिटीच्या पुनर्रचनेवरून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप करत भाजप अल्पसंख्याक सदस्यपदाचा मुसा खान पठाण यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकारामुळे बीड भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
अल्पसंख्याक कमिटीमध्ये फेरबदल होऊन जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, पुन्हा त्याच कमिटीची पुनर्रचना करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांना संघटनात्मक जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.मुसा खान पठाण यांनी पक्षाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून मी भाजपसोबत सातत्याने निष्ठेने काम केले आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली, ती प्रामाणिकपणे आणि चोखपणे पार पाडली. आमच्या प्रत्येक बूथवर भाजपला लीड मिळवून देण्यासाठी आम्ही काम केले. मात्र, आज निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार केला जात नाही. मग एकनिष्ठ राहण्याचे हेच फळ का?” असा सवाल त्यांनी केला.
पक्षाने सध्या ज्या व्यक्तीवर जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी यापूर्वी वेळोवेळी भाजपसोबत धोकेबाजी केल्याचा आरोपही पठाण यांनी केला. “ज्यांना जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांच्या बूथवरून केवळ ६५ मतदान मिळाले. आम्ही मात्र पक्षासाठी सातत्याने काम केले. असे असताना निष्ठावंतांना डावलून कोणत्या निकषावर जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पक्षश्रेष्ठींनी या नाराजीची दखल घेऊन दहा दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी मुसा खान पठाण यांनी केली आहे. “दहा दिवस मी वाट पाहणार आहे. या काळात पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रश्नावर काही विचार केला नाही, तर पक्ष सोडण्याची तयारी आहे,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
‘बुडतीचे पाय डोहोकडे’ अशी अवस्था?
दरम्यान, केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. सत्तेच्या काळात नवीन चेहरे आणि राजकीय समीकरणांना प्राधान्य देताना जुन्या कार्यकर्त्यांची उपेक्षा होत असल्याची भावना वाढत आहे. त्यामुळे ‘बुडतीचे पी दोहोकडे’ अशी अवस्था सध्या भाजपची होत चालली आहे का?, असा सवाल आता निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.
पक्षाच्या अडचणीच्या काळात झेंडा खांद्यावर घेऊन रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांना संघटनेत योग्य स्थान आणि जबाबदारी मिळणार नसेल तर ‘किती वर्षे वाट पाहायची?’ हा प्रश्न निष्ठावंत पक्षश्रेष्ठींना विचारत आहेत. बीडमधील अल्पसंख्याक कमिटीच्या निमित्ताने समोर आलेली ही नाराजी आगामी काळात जिल्हा भाजपच्या संघटनात्मक राजकारणावर काय परिणाम घडवते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.