Arvi Shantivan 45th Marathwada Sahitya Sammelan
स्व. बाबा आमटे साहित्यनगरी आर्वी : गेल्या काही वर्षात पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल आहे. विशेष म्हणजे देशाचे उद्याचे भविष्य असलेली नवी पिढी मोबाईल आणि रिल्सच्या विळख्यात सापडली आहे. या परिस्थितीत पुस्तके वाचनाऱ्यांची संख्या वाढवायची असेल, विध्यार्थी आणि तरुणांच्या हातात पुस्तके पाहायची असतील तर लेखक आणि साहित्यिकांनी आपल्या साहित्यात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीवा जपणारे, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे लिखाण केले पाहिजे, असे स्पष्ट मत 45 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी केले.
तर साहित्यातील विविध प्रवाहांनी वंचित- उपेक्षित घाटकांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष फ. म. शहाजिंदे यांनी केले. ते शांतीवन प्रकल्प आर्वी येथे 45 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्यभरातील नामवंत साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मोठी उपस्थिती होती.
मराठवाडा साहित्य परिषद आणि भवानी विध्यार्थी कल्याण प्रतिष्ठान, शांतीवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मराठावाडा साहित्य संमेलनाचे शुक्रवारी (दि.10) अतिशय थाटात आणि उत्साहात उद्घघाटन झाले.
यावेळी संमेलनाध्यक्ष फ. म. शहाजिंदे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा दिगंत आमटे, गिरीश कुलकर्णी, आ. सुरेश धस, जेष्ठ साहित्यिक भारत सासणे, फ. मु. शिंदे, कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, आसाराम लोमटे, रामचंद्र काळुंखे, दीपाताई क्षीरसागर, दत्ता बारगजे, संतोष गर्जे यांच्यासह साहित्य आणि समाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीप प्रज्वलनानंतर शांतीवनचे दीपककाका नागरगोजे यांनी स्वागत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले संवेदनशील मन असल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दुष्काळी भागात शांतीवन सारखे सामाजिक प्रकल्प अनाथ, वंचित आणि निराधार बालकांच्या पुनर्वसनासाठी जे काम करत आहेत. ते काम साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी पहावे. सामाजिक प्रश्नावर त्यांनी लिखाण करावे या उदात्त हेतूने शांतीवन येथे मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित केले असल्याची भूमिका स्पष्ट केली.
शांतीवनच्या माध्यमातून 50 पेक्षा अधिक मुले एमबीबीएस डॉक्टर बनले आहेत. तसेच इतरही अनेक क्षेत्रात प्रकल्पाने पुनर्वसित केलेल्या मुलांनी झेप घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आ. सुरेश धस यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियात विघातक लिखाण करणारावर अंकुश असावा, साहित्यिक मंडळींनी यासाठी हातात चाबुक आणि हंटर घेतले पाहिजे अशी भूमिका मंडली. तसेच शांतीवन आणि दीपककाका व कावेरीताई यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाड्याचा इतिहास, मराठवाड्यातील साहित्य, लेखक, कवी यांच्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रात मराठवाड्याचे खूप मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचा शासन आणि प्रशासनावरचा विश्वास उडाला असून अशा परिस्थितीत नवलेखांनी दर्जेदार साहित्यातून समाज परिवर्तन घडवले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटक डॉ. दिगंत आमटे यांनी अभ्यासपूर्ण मनोगत वाचन संस्कृतीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नवलेखकांनी साहित्यात विज्ञान आणले पाहिजे. नव्या पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आधुनिक शैलीतून साहित्य लेखन करावे. तसेच सामाजिक जाणीवा प्रगल्भ करणारे साहित्य लिहिले पाहिजे असे सांगितले.
संमेलनाचे अध्यक्ष फ. म. शहाजिंदे यांनी अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषणात जाती व्यवस्थेने समाजाचे वाटोळे केले. परंतु, साहित्यातील विविध प्रकारांनी वीर जाती धर्मात सलोखा राखण्याचे काम केले. सुफी साहित्य आणि मुस्लिम- मराठी साहित्याची सामाजिक परिवर्तनात आणि अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्यात मोठी भूमिका असल्याचे शहाजिंदे यांनी शेवटी सांगितले.
अलीकडच्या काळात मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल दिसतो. शांतीवन येथे आल्यानंतर मला पुस्तके हातात घेतलेली मुले आणि मुली दिसल्या. मी शांतीवन मध्ये आहे की आनंद वनात? असा क्षणभर प्रश्न पडला. स्व. बाबा आमटे यांचे काम पुढे घेऊन जाण्याचे काम एकटा आमटे परिवार करत नाही तर दीपक नागरगोजे आणि शांतीवन प्रकल्प करत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. अनघा आमटे यांनी केला. वाचन संस्कृतीला गत वैभव मिळून देणे काळाची गरज आहे. यासाठी लहान मुलांना स्क्रीन पासून दूर करत पुस्तकांकडे घेऊन जावे लागेल. यासाठी साहित्यात विज्ञान आले पाहिजे. आजच्या मुलांची आवड काय हे ओळखून मुले पुस्तकांकडे वळतील असे साहित्य आणि आधुनिक पुस्तके लिहिली पाहिजेत, असे डॉ. अनघा आमटे म्हणाल्या.
अलीकडच्या काळातील साहित्यात सामान्य माणसाच्या जगण्याचे वास्तव चित्र दिसत नाही. आधुनिक साधनांच्या तुलनेत पुस्तकातून मनोरंजनही होत नाही. यामुळे पुस्तकांना वाचक नाही. वाचन संस्कृतीला बळ द्यायचे असेल, तरुण पिढीच्या हातात पुस्तके पाहायचे असतील तर आजच्या काळातील सामाजिक प्रश्न साहित्यात दिसले पाहिजेत. सामान्य माणसाच्या व्यथांचे प्रतिबिंब साहित्यात दिसले पाहिजे, तरच लोक पुस्तकाकडे वळतील, असे विचार समाजसेवक डॉ. गिरीश कुलकर्णी व्यक्त केले.