

गौतम बचुटे
केज : तालुक्यातील मस्साजोग येथे वाहन थांबविण्याच्या कारणा वरून एकाने एसटीच्या वाहकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला होता. त्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला सहा महिन्याच्या कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
जालना आगाराची एसटी जालना-कलबुर्गी ही एसटी क्र (एम एच-२०/ बी एल-४०८३) कलबुर्गीकडे जात असताना दि. ३० जून २०२२ रोजी सकाळी ९:१५ वा. मस्साजोग येथील थांब्यावर प्रवाशांची चढ-उतार करीत असताना सुदर्शन देशमुख रा. मस्साजोग याने वाहक नितीनकुमार प्रल्हादराव तायडे यास मारहाण केली आणि शासकीय कामात अडथळा आणला. त्यानंतर चालक-वाहकांनी गाडी केज पोलीस ठाण्यात आणून मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करणारा सुदर्शन देशमुख याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३७९/२०२२ भा. दं. वि. ३५३, ३३२ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत होते.
या प्रकरणी केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर के शेख यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद आणि सादर केले. पुराव्यांच्या आधारे सुदर्शन देशमुखला सहा महिन्याची कैद आणि एक हजार रु. चा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
प्रत्यक्ष घटना पाहणारा साक्षीदार, तपास अधिकारी यांची साक्ष ठरली
भांडण होत असताना प्रत्यक्ष घटना पाहणारा साक्षीदार प्रवाशी रमेश महामुनी, एसटीची चालक, घटनास्थळ पंच, फिर्यादी आणि तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील या पाच साक्षीदारांची साक्ष तसेच सहाय्यक सरकारी वकील राम बिरंगळ यांनी केलेला युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे या आधारे आरोपी सुदर्शन देशमुख याला भा. दं. वि. ३५३ आणि ३३२ नुसार सहा महिन्याची कैद आणि एक हजार रु. चा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील राम बिरंगळ, पैरविकार भालेराव मॅडम यांनी काम पाहिले.