अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ, बाराभाई गल्ली परिसरात झालेल्या घरफोडीचा अंबाजोगाई पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास केला. घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी शनिवारी (दि.७) अटक करून त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी काझी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन ( रा. बाराभाई गल्ली अंबाजेगाई) यांच्या बंद घरात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री १.२५ वाजता दोन चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चार लाखाची रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा ११ लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीनी अंबाजोगाई पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित पठाण मोहम्मद रियाज खान (वय २५, रा. बाराभाई गल्ली) व सलमान मुस्तफा शेख (वय ३१, रा. झारेगल्ली, अंबाजोगाई) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.