

पाचगाव : येथील शिक्षक कॉलनीतील बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल दहा तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 13 हजार रुपयांची रोकड लंपास केली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही धाडसी चोरी झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, अज्ञात चोरट्यांविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नथुराम काळू शिंदे (वय 62, रा. प्लॉट नं. एफ 14, शिक्षक कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे कुटुंबीय कामानिमित्त सातारा येथे गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन बेडरूममधील तीन कपाटे फोडून त्यांनी आतील मौल्यवान ऐवज आणि रोख रकमेवर डल्ला मारला.
शिंदे हे पत्नीसह शुक्रवारी सातार्याला गेले होते. त्यांचा मुलगा आशिष घरीच होता. मात्र, नातीची आठवण येत असल्याने शिंदे यांनी शनिवारी मुलालाही सातार्याला बोलावून घेतले. आशिष घराला कुलूप लावून गेल्यानंतरच हा चोरीचा प्रकार घडला. सोमवारी सकाळी सातच्या सुमारास शेजार्यांना शिंदे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी तत्काळ फोन करून माहिती दिली. शिंदे यांनी कोल्हापुरात परतण्यापूर्वीच करवीर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी घरातील विविध वस्तूंचे ठसे घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.