केज : देवदर्शनवरून परतताना भरधाव कारची पुलाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर आठजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.१०) सायंकाळी ५.३० सुमारास केज-अंबाजोगाई दरम्यान असलेल्या चंदनसावरगाव जवळच्या एका हॉटेलजवळ घडली. निवृत्ती मुलपडे (वय ७०) असे अपघातातील मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नांदेड जिल्ह्यातील कारेगाव येथील भाविक हे कपिलधार येथील मन्मथ स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन नांदेड जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे जात असताना केज-अंबाजोगाई दरम्यान चंदनावरगाव ता. केज येथील हॉटेल मोरया जवळ असलेल्या एका पुलाला त्यांची इर्टिगा कार क्र.(एम एच-२६ /सी पी-६३१५) ही भरधाव वेगातील कार पुलाला धडकली. या भीषण अपघातात कार मधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी सर्वजण नांदेड जिल्ह्यातील कारेगाव येथील रहिवासी आहेत.
या भीषण अपघातात मृत झालेल्या वृद्धाचे नाव निवृत्ती मुलपडे (वय ७०) असे आहे. तर चंद्रकांत मुलपडे, संगीता मुलपडे, अनुष्का लिंडले, शिवनंदा लिंडले, सत्याभामा मुलपडे, चंचल बोमनाळे, सुमन बोमनाळे व सुशांत बोमनाळे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मांजरे, जमादार गोपीनाथ डाके व पोलीस नाईक महेश कोकाटे घटनास्थळी दाखल झाले.