

ठाणे : भिवंडी येथील अंजुरगाव येथून ठाण्यातील घोडबंदर रोड येथे सकाळी १५ टन सिमेंट काँक्रीट घेऊन निघालेला सिमेंट मिक्सर ही गाडी ठाण्यातील नाशिक- मुंबई महामार्गावरील खारेगाव टोल नाक्याजवळ दुभाजकाला धडकून उलटली. रविवारी सकाळी अकरा ते सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी, त्या अपघाताने सुमारे दोन तास तो महामार्ग खोळंबला होता. सिमेंट मिक्सर ही गाडी रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर आणि अपघातामुळे रस्त्यावर पसरलेल्या तेलावर माती पसरविण्यात आल्यानंतर तो रस्त्या वाहतुकीवर खुला करण्यात आला. हा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
सिमेंट मिक्सर चालक अरविंद गुप्ता हा रविवारी सकाळी भिवंडी अंजुरगाव येथून १५ टन सिमेंट काँक्रीट घेऊन ठाणे घोडबंदर रोड येथे निघाला होता. नाशिक- मुंबई महामार्गावरील खारेगाव टोल नाक्याजवळ आल्यावर चालक गुप्ता याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकून जागीच उलटली. या अपघाताची माहिती वाहतूक पोलिस कर्मचारी उमेश ठाकूर यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समोर आले.
या अपघाताने वाहतूक खोळंबल्याने तातडीने अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर ही गाडी क्रेन मशिनच्या सहाय्याने सरळ करून रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला आहे. तसेच या अपघाताने रस्त्यावरती तेल ही पसरले होते. त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ माती पसरवल्यानंतर तो रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. याचदरम्यान नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक सुमारे २ तास धीम्या गतीने सुरू होती. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.