Attack on Dalit family at Gauravadi
केज, पुढारी वृत्तसेवा
केज तालुक्यातील गौरवाडी येथे एका दलित कुटुंबावर गावातील व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नऊ जणा विरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध गुन्हे दाखल झाले आहेत.
२ जून रोजी सायंकाळी नितीन दुनघव आणि त्यांची आई सुमीत्राबाई दुनघव हे मोटर सायकल वरून बीड येथून गौरवाडी येथे घरी परत येत असताना, त्यांच्या घरा जवळ असलेल्या रस्त्यावर गावातील विलास दादाराव घाडगे व इतर आठ जणांनी त्यांना अडवले आणि तुम्ही या रस्त्याने येऊ नका. असे म्हणत नितीन दुनघव आणि त्यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.
नितीन दुनघव यांची पत्नी अंजली, आई सुमीत्राबाई आणि भावजई दिपाली यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली. महिलांना देखील केस धरून खाली पाडणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण झालेल्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नितीन दुनघव याने दिलेल्या तक्रारी वरून विलास दादाराव घाडगे, कल्याण दादाराव घाडगे, दिपक विलास घाडगे, आर्चना दिपक घाडगे, राधाबाई कल्याण घाडगे, पारुबाई भारत घाडगे,
उषाबाई विलास घाडगे, रावसाहेब बाजीराव घाडगे आणि भारत बाजीराव घाडगे या नऊ जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत.