कडा (पुढारी वृत्तसेवा):
सध्या अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांसह विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांची आष्टी शहरातील संगणक केंद्रवाल्यांकडून सर्रास आर्थिक लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाच्या विविध सेवांसाठी, विशेषतः शेतकऱ्यांच्या केवायसी (KYC) अद्ययावतीकरणासाठी, केवळ दोन मिनिटांच्या कामासाठी १०० ते २०० रुपयांपर्यंत अवाजवी शुल्क आकारले जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत, तर प्रशासन मात्र या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत 'कुंभकर्णी झोपे'त असल्याची तीव्र टीका होत आहे.
शेतकऱ्यांचे केवायसी (Know Your Customer) अद्ययावत करणे हे अतिवृष्टीग्रस्त मदतीसाठी अत्यावश्यक झाले आहे. मात्र, संगणक केंद्रचालक याच गरजेचा गैरफायदा घेत आहेत.
'दोन मिनिटांचे काम, २०० रुपयांची वसुली': शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, केवायसी अद्ययावत करण्याची प्रक्रिया संगणकावर केवळ दोन मिनिटांत पूर्ण होते, तरीही त्यासाठी चक्क २०० रुपये आकारले जात आहेत. "काम उरकतात, पण आमचा खिसा मात्र रिकामा करतात," अशी संतप्त भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शासकीय योजना आणि इतर कामे: केवायसी व्यतिरिक्त शासकीय योजनांचे अर्ज, बँक आणि विमा संबंधित कामे अशा प्रत्येक सेवेसाठी १०० रुपयांच्या खाली शुल्क घेतले जात नाही. यामुळे अतिवृष्टीने आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी पुन्हा पिळला जात आहे.
शहरातील व शाळेजवळील संगणक केंद्रांवर विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास साधारणपणे १५ ते २० मिनिटे लागतात, परंतु या कामासाठीही प्रत्येक फॉर्ममागे २०० रुपये मागितले जात आहेत. यामुळे सामान्य कुटुंबातील पालकांना मुलांच्या शिक्षणासोबतच हा अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
आष्टी शहरातील ही संगणक केंद्रे रोज शेकडो नागरिकांकडून १०० ते २०० रुपये शुल्क वसूल करतात. या मनमानीमुळे या केंद्रचालकांची एका दिवसाची कमाई सहजपणे हजारो रुपयांवर पोहोचते, तर दुसरीकडे सामान्य नागरिक आणि विद्यार्थी आर्थिक तंगीमध्ये अडकत आहेत. ही लूट तातडीने थांबवण्याची मागणी जोर धरत आहे.
या अवाजवी वसुलीमुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांनी एकमताने सांगितले की, "प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या संगणक केंद्र चालकांची तपासणी करावी आणि ही लूट त्वरित थांबवावी, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील."
याप्रकरणी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसील प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "आष्टी शहरातील संगणक केंद्रांवर अवाजवी वसुली सुरू आहे आणि यासाठी तहसील प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही रस्त्यावर उतरून या लुटारू संगणक केंद्रवाल्यांविरुद्ध मोठे जनआंदोलन करू."
नागरिक आणि राजकीय पक्षाच्या इशाऱ्यानंतर तरी आता प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.