

Beed Georai crop damage
सुभाष मुळे
गेवराई : तालुक्यासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच गंभीर झाली आहे. पावसाच्या तडाख्याने हजारो हेक्टरांवरील उभे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी तसेच संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी तलवाडा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरेशराव हात्ते यांनी केली आहे.
ॲड . सुरेशराव हात्ते यांनी यावेळी विशेषतः निदर्शनास आणून दिले की, राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवर होल्ड लावले आहे. यामुळे आधीच नुकसान झालेला शेतकरी आणखी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे बँक व्यवहार ठप्प झाल्याने शेतीची पुढील कामे करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या होल्डची तात्काळ समाप्ती करण्याचे आदेश शासनाने संबंधित बँकांना द्यावेत, अशी त्यांनी जोरदार मागणी केली आहे. गेवराई तालुक्यातील गढी, जातेगाव, पाचेगाव, सिरसदेवी, धोंडराई, तलवाडा, उमापूर, मादळमोही, चकलंबा या मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्या आठ–दहा दिवसांत मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर अनेक गावांतील शेतजमिनींवर माती वाहून गेल्याने शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांसह मातीच वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.
येत्या हंगामात शेतकऱ्यांकडे बियाणे, खत, कीडनाशकांची तरतूद करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री किंवा आर्थिक स्रोत उपलब्ध नाहीत. कर्जाचा डोंगर वाढलेला असतानाच उत्पन्नाच्या सर्व मार्गांवर पावसाने पाणी फिरवले आहे. शेतकरी कुटुंबाची झालेली गुंतवणूक मातीमोल झाली असून कुटुंबाचा संसार उध्वस्त होण्याची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. सुरेशराव हात्ते यांनी पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधले असून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, बँक खात्यांवरील होल्ड तात्काळ उठवावा अशी ठोस मागणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.