व्हे पावडर प्रकरणात दिलीप हंबर्डेला अटक pudhari photo
बीड

Beed Crime : व्हे पावडर प्रकरणात दिलीप हंबर्डेला अटक

दूध भेसळीचा गोरख धंदा : आष्टी पोलिसांची कारवाई; सात दिवसांची पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

आष्टी, कडा : भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरची अवैध वाहतूक व विक्रीप्रकरणी आष्टी पोलिसांनी यापूर्वी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आष्टी येथील जिल्हा बँकेचे माजी संचालक दिलीप जानदेव हंबर्डे याचे नाव समोर आल्यानंतर आष्टी पोलिसांनी त्याला सोमवारी रात्री अटक केली.

या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध तयार करण्याच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, कैलास हंबर्डे व दिलीप हंबर्डे या दोघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याने या चौकशीतून मोठे रॅकेट समोर येणार आहे.

आष्टी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयित पिकअप वाहनावर कारवाई करत एकूण 72 गोण्या, तब्बल 1,800 किलो व्हे पावडर जप्त केली होती. या मुद्देमालाची किंमत सुमारे 2 लाख 69 हजार 700 रुपये असल्याचे पोलिसांच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम,2006 तसेच भारतीय न्याय संहिता,2023 मधील संबंधित कलमान्वये आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील यशवंत उर्फ सुशांत ऊर्फ बाबू लक्ष्मण गोपालघरे याला पोलिसांनी यापूर्वी अटक करून न्यायालयीन प्रक्रियेसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर फरार असलेल्या कैलास जनार्दन हंबर्डे याला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून जिल्हा बँकेचे माजी संचालक दिलीप जानदेव हंबर्डे याचे नाव समोर आल्याने त्याला पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी अटक केली.

तब्बल 1,800 किलो व्हे पावडरचा साठा नेमका कुठून आणला होता? तो कोणाला पुरवला जाणार होता? दुधात भेसळ करण्यासाठी त्याचा वापर होणार होता का? या मागे आणखी कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील यशवंत सुशांत ऊर्फ बाबू लक्ष्मण गोपाळघरे, कैलास जनार्दन हंबर्डे आणि दिलीप जानदेव हंबर्डे या तिन्ही आरोपींच्या सहभागामुळे व्हे पावडरची अवैध वाहतूक नेमकी कुठून सुरू होती, ती कोणाला पुरवली जाणार होती आणि या प्रकरणामागे आणखी कोण आहे, याचा आता पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

दिलीप हंबर्डे अनेक वर्षांपासून दूध व्यवसायात

दिलीप हंबर्डे हा गेल्या अनेक वर्षांपासून दूध व्यवसायात आहे. त्यांच्या अक्षदा मिल्क प्रॉडक्टसच्या माध्यमातून हजारो लिटर दूध संकलन केले जाते होते, तो प्लान्ट सध्या बंद असला तरी शिवगंगा दूध पावडर प्लांटचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. एवढे दिवस दुग्ध व्यवसायात नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हंबर्डे यांना आता अशा प्रकरणात अटक करण्यात आल्याने याची मोठी चर्चा होत आहे.

व्हे पावडर म्हणजे काय?

व्हे पावडर म्हणजे दुधाची बुकटी असते. दुधातील महत्त्वाचे घटक कायम ठेवून ही पावडर तयार केली जाते. सर्वसामान्य ग्राहक जेव्हा दूध खरेदी करतात तेव्हा ते गायीचे अथवा म्हशीचे म्हणून खरेदी करतात. परंतु आष्टी तालुका व शहरात अनेकजण त्यांच्याकडे गायी-म्हशी नसतानाही दूध विक्री करायचे अशी चर्चा व्हायची. हे लोक अशा दूध पावडरपासून दूध तयार करून ते विक्री करत होते, तसेच गाय अथवा म्हशीच्या दुधामध्ये ते मिक्स करून फसवणूक करत होते की काय, असा देखील संशय आता व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT