

परतूर : शहरात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने जय मल्हार चौक परिसरात संशयीत दुचाकीस्वाराला पकडून त्याच्या ताब्यातून ७४ हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी (दि. २९) रोजी सकाळी पावणे आठ वाजता परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार गोविंद पवार हे त्यांचे सहकारी जमादार अशोक गाढवे आणि विजय जाधव यांच्यासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खबऱ्याने माहिती दिली की, एक इसम दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा घेऊन वखार महामंडळ रोडने जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष जय मल्हार चौक येथे सापळा रचला.
यावेळी एका हिरो पॅशन (क्र.एमएच २१ सीई ७२६६) या दुचाकीवरून जाणाऱ्या एका इसमास थांबवून पंचांसमक्ष त्याची अंगझडती व वाहनाची तपासणी केली असता, त्याच्याकडे वायरच्या पिशव्यांमध्ये विविध कंपन्यांचा मानवी आरोग्यास अपायकारक असलेला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखू मिळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये चौदा हजारांचा राजनिवास सुगंधी पानमसाला व जर्दा, चार हजारांचा विमल पानमसाला व तंबाखू , सहा हजारांचा गोवा गुटखा, पन्नास हजार रुपये किमतीची हिरो पॅशन दुचाकी असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.या कारवाईने खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी काजी रफियोद्दीन खुर्शिद काजी (रा. काजी गल्ली, परतूर) याच्याविरुद्ध पोलिस अमलदार गोविंद पवार यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार जनार्धन पालवे हे करत आहेत.