अंबाजोगाई : परळी तालुक्यातील पहाडी वडगाव येथील एका खासगी शाळेत सेवक म्हणून कार्यरत असलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह सोमवारी सकाळी अंबाजोगाई शहरातील टप्पा चौक परिसरात आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा अपघात आहे, घातपात आहे की अन्य काही कारण, याचा सर्व अंगांनी तपास अंबाजोगाई शहर पोलिस करत आहेत.
मृत व्यक्तीचे नाव विवेक करपे (वय ४१, रा. जवळबन, ता. केज) असे असून ते वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील एका खासगी शाळेत सेवक म्हणून कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते केज येथे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्यास होते. सोमवारी पहाटे टप्पा चौक परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
प्राथमिक तपासानंतर मृताची ओळख विवेक करपे अशी पटली. घटनास्थळी मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला, त्यामुळे विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहे. शरीरावरील जखमा, घटनास्थळाची स्थिती तसेच इतर बाबींच्या आधारे पोलिस अपघात आणि घातपात या दोन्ही शक्यता तपासत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विवेक करपे यांच्या पश्चात पत्नी, इयत्ता दहावीत शिकणारा मुलगा आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीसह सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षानंतर मृत्यूमागील गूढ उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात आणखीन एक स्वतंत्र चौकट द्यायची टी अशी की दोन दिवसांपूर्वी याच तालुक्यात आणखी एक खुनाची घटना घडली होती, गुन्हेगारांवर पोलिसांचा वाचक, दरारा हा राहील नाही, त्यामुळे जिल्ह्यातील क्राईम वाढत चालला आहे, पोलिसांच्या हप्ताखोरीमुळे गुन्हेगारांचे मनोबलही वाढत चालले आहे. यावर वेळीच प्रतिबंध घालण्याची मागणी जनतेतून होत आहे.
दोन दिवसांत दोन संशयास्पद मृत्यू
अंबाजोगाई तालुक्यात अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने आणखी एका गंभीर गुन्ह्याची घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेचा तपास सुरू असतानाच आता शाळेच्या सेवकाचा संशयास्पद मृत्यू उघडकीस आल्याने तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.