Nagpur crime : भांडेवाडीत कारागृहातून सुटलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या; नवीन कामठीत विवाहित महिलेचा मृतदेह आढळला

काही तासांत दोन खळबळजनक हत्या; पोलिसांकडून तपासाची गती वाढवली
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

नागपूर : उपराजधानी नागपुरात अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांच्या घटनांनी शहरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. एका घटनेत भांडेवाडी परिसरात कारागृहातून नुकताच सुटलेल्या एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत नवीन कामठी परिसरात एका विवाहित महिलेची हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या घटनेत वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर, भांडेवाडी परिसरात गणेश प्रितमलाल बोरकर या युवकाची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार गणेश हा स्थानिक स्तरावर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची चर्चा असून त्याच्याविरुद्ध अत्याचारासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

Murder Case
Moharram Procession Case: उंदराचे विष.. पेन किलर गोळ्या; अन् मोहर्रममध्ये १५०० लोकांना मारण्याचं प्लॅनिंग, हा कसला सूड?

माहितीनुसार, गणेश काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. यापूर्वी तो अवैध दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे. तो एकटाच राहत होता, तर त्याच्या दोन पत्नी आणि तीन मुले वेगळी राहत असल्याची माहिती मिळाली आहे. हत्येमागे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी जुने वैमनस्य, गुन्हेगारी वाद किंवा इतर कारणांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

दरम्यान, दुसरी घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडा-शिरपूर रोड परिसरात उघडकीस आली. रस्त्याच्या कडेला एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक वार आढळून आले असून तिची ओळख भाग्यश्री (वय ४२) रा. गाडा, कामठी अशी पटली आहे. भाग्यश्री या दोन मुलांची आई असून नागपूर येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला.

Murder Case
Ketan Agarwal Murder Case: लोहगडावरील मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; एका हुडीमुळे कसं उलगडलं केतन अग्रवालच्या मृत्यूचं गूढ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री या काही काळापासून विनोद उर्फ राजेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. विनोद हा नशेच्या आहारी गेला असून त्याच्या संशयी स्वभावामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. सततच्या वादाला आणि त्रासाला कंटाळून भाग्यश्री काही काळापूर्वी त्याच्यापासून वेगळ्या राहत होत्या आणि वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होत्या.

या प्रकरणात संशयाच्या आधारे नवीन कामठी पोलिसांनी विनोद उर्फ राजेंद्र याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्याच्या सहभागाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. सर्व बाजूंनी तपास सुरू असून तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीबाबत स्पष्ट माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news