

खेड : खेड तालुक्यातील साखरोली गावानजीकच्या जंगल परिसरात २२ जून रोजी पहाटे अज्ञात व्यक्तीचा मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरोली परिसरातील जंगल भागात काही नागरिकांना मानवी सांगाडा दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विवेक आहिरे तसेच सहायक पोलिस निरीक्षक केंद्रे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे संकलित केले असून सांगाडा पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. संबंधित मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला असून वैद्यकीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपाताचा परिणाम आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र पोलिसांनी कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचता सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू ठेवला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींची छाननी करण्यात येत असून तपासाला वेग देण्यात आला आहे. या घटनेमुळे साखरोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.