Ramabai Ranveer financial help pudhari photo
बीड

Ramabai Ranveer financial help : मुलीच्या शिक्षणासाठी धावणार्‍या रमाबाईंना प्रशासनाचा आधार

जिल्हाधिकारी जॉन्सन व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून पन्नास हजारांची मदत

पुढारी वृत्तसेवा

बीड: अंबाजोगाई येथील रमाबाई रणवीर यांनी मुलीच्या शिक्षणासाठी मॅरेथॉन स्पर्धेत धाव घेतली होती. त्या या स्पर्धेत विजयी तर झाल्याच परंतु मुलींच्या शिक्षणासाठी त्यांची असलेली धडपड पाहून आता त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या पुढाकारातून रमाबाईंना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरांगे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महसूल अधिकारी व जिल्हा प्रशासनाच्यावतीने रमाबाई रणवीर यांचा यथोचित सन्मान करत ५० हजार रुपयांची रोख रक्कमेतून मदतीचा हात देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या पुढाकारातून मदत निधी संकलित करण्यात आला.

रमाताईंच्या विजयामागे केवळ स्पर्धां जिंकण्याची इच्छा नव्हती तर मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करण्याची आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक मदत मिळविण्याची प्रबळ प्रेरणा होती. त्यामुळे त्यांचा हा विजय केवळ एका मॅरेथॉन स्पर्धेतील विजय न राहता आईच्या ममतेचा, त्यागाचा, संघर्षाचा आणि मातृत्वाच्या जिद्दीचा विजय ठरला आहे.

त्यांच्या या प्रेरणादायी यशाची दखल जिल्हा प्रशासनानेही घेतली आहे. आपल्या मुलींच्या भविष्यासाठी एक आई किती कष्ट सोसू शकते, याचे रमाताई या मूर्तिमंत उदाहरण आहेत. असे भावनिक आणि गौरवास्पद उद्गार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काढले.

रमाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रु!

रमाताईंच्या दोन्ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत भविष्यात शिक्षणासाठी काही अडचण आल्यास आपण त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे असल्याची नि:संदिग्ध ग्वाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. जिल्हाधिकारी श्री.जॉन्सन यांच्या या संवेदनशील आणि तत्पर भूमिकेमुळे रमाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले. जिल्हा प्रशासनाने वेळेवर दिलेल्या या आर्थिक बळामुळे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याची भावनाही रमाबाई रणवीर यांनी यावेळी बोलून दाखविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT