All crops, including soybean, devastated due to lack of rain
अतुल शिनगारे
धारूर : तालुक्यात यंदा सुरुवातीला झालेल्या पावसानंतर पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यासह सर्वच पिके पावसाअभावी करपू लागली असून अनेक ठिकाणी पिकांची अक्षरशः राखरांगोळी झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
धारूर तालुक्यात यंदा एकूण ४२ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक १९ हजार १४३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तर १६ हजार ९७१ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रात मूग, उडीद तसेच अन्य खरीप पिकांची पेरणी करण्यात आली आहे.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण करून पिकांची चांगली उगवण झाली होती. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळाला नाही. परिणामी सुरुवातीला जोमाने वाढणारी पिके आता उन्हाच्या तीव्रतेने आणि पाण्याअभावी करपू लागली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधांची फवारणी, मशागत व पेरणी यासाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम पावसाअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
धारूर, पांगरी, आवरगाव, गोपाळपूर, अंजनडोह, रुई-धारूर, पिंपळवाडा, चोरंबा, अरणवाडी, आंबेवडगाव, पहाडी, पारगाव यासह तालुक्यातील विविध गावांमध्ये पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकत आहेत, तर कापूस पिकाचीही वाढ खुंटली आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तालुक्यातील पिकांची तातडीने पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत व दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
कोरडा दुष्काळ जाहीर करावा
धारूर तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने जोमात आलेली सोयाबीन कापूससह इतर पिकांची राख रांगोळी झाली आहे. शेतकरी बांधवाने बी-बियाणे मशागत फवारणीवर खर्च केला पण केलेला खर्च, मेहनत सगळीच वाया जात आहे शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक, मानसिक ताणामध्ये शेतकरी जगत आहे. प्रशासनाने तत्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला आर्थिक दिलासा द्यावा तसेच यावर्षीचा पीकविमा तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावा. कर्जमाफी केलेली तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करून नवीन पीक कर्ज द्यावे, अशी मागणी पांगरी येथील शेतकरी राम थोरात यांनी केली आहे.