

Umesh Mane Police Custody
केज : विवाहित महिलेवर वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून, त्याचे व्हिडिओ काढून धमकावल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला उमेश माने याला केज न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उमेश माने हा विलास घुले खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्याच्या पोलिस कोठडीकडे विशेष लक्ष लागले आहे.
कदमवाडी येथील एका विवाहित महिलेने उमेश माने याच्यावर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ काढल्याचा आरोप केला होता. हे व्हिडिओ दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे तसेच प्रकाराची वाच्यता केल्यास महिला, तिचा पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने पीडितेने सोशल मीडियावरून आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर १४ जुलै रोजी केज पोलिस ठाण्यात उमेश मानेविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर उमेश माने फरार झाला होता. प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना १ सप्टेंबर रोजी तो कदमवाडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे यांच्या पथकाने दुपारी तीनच्या सुमारास त्याला घरातून ताब्यात घेतले. २ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
२० जून रोजी विलास घुले हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे उमेश मानेची सीआयडीकडूनही चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घुले कुटुंबीयांनी पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांचे नाव घेत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. यासाठी आंदोलन आणि उपोषणही करण्यात आल्याने या प्रकरणाला राज्यभरात चर्चेचे स्वरूप आले आहे.