Court Verdict Ambajogai Omshanti Case
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील ओमशांती साधना धाम केंद्रातील तरुणीच्या मृत्युप्रकरणातील सर्व संशयित आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन न्यायमूर्ती रश्मी तेहरा यांनी आज (दि. ११) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
संशयित आरोपी सुनीता किसनराव कुलकर्णी, प्रियदर्शनी विजयनाथ पांचाळ, मंजुषा विजयकुमार पांचाळ (रा. ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई) महानंदा भीमाशंकर रामपूर, पुरुषोत्तम शिवराम मांगुळकर (रा. ओमशांती कॉलनी, उदगीर) यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा आत्माराम आलाट (वय 26) या तरुणीने दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी जाळून घेऊन आपले जीवन संपविले होते. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात पूजाचा भाऊ अविनाश आत्माराम आलाट (रा. कोळपिंप्री, ता. धारुर) यांनी तक्रार दिली होती.
ओमशांती केंद्रातील सुनिता, महानंदा, प्रिया, मंजू बहिणजी व पुरुषोत्तम मांगूळकर हे पूजाला विनाकारण त्रास देत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून पूजाने जाळून घेतले. तिच्यावर उपचार चालू असताना दि. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी पहाटे पूजाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी तक्रार पूजाच्या भावाने केली होती. या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन हे प्रकरण सुनावणी साठी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या खटल्याची आज सुनावणी पूर्ण झाली.
या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले, परंतु फिर्यादी पक्ष हा आरोप सिद्ध करू न शकल्याने तसेच आरोपींच्या वकिलाचा बचाव तसेच वर नमूद संस्थेस बदनाम करण्यासाठी वरील सर्वांविरुद्ध खोटी केस केल्याने सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे अॅड.अजित लोमटे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. किशोर देशमुख, अॅड. अमोल ओपळे, अॅड. नवनाथ साखरे, अॅड. धनराज लोमटे, अॅड. ओमप्रकाश धोत्रे, अॅड. विश्वजित जोशी, अॅड. अभिजित सोळंके, अॅड. गिराम, अॅड. ठाकूर यांनी सहकार्य केले.