Abduction of a minor girl by spraying her face
शिरूर, पुढारी वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील वडाळी गावातील एका अल्पवयीन मुलीच्या तोंडावर स्प्रे मारून तिचे अपहरण केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. अपहरणकर्त्यांनी या मुलीला घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात हातपाय बांधून टाकून दिले. या प्रकरणात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार शनिवारी दुपारी समोर आला. सदरील सतरा वर्षीय मुलगी आपल्या घराच्या पाठीमागे थांबलेली असताना त्या ठिकाणी आलेल्या दोघाजणांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला.
यानंतर मुलगीला गुंगी आल्याने या दोघांनी तिला ओढत जवळच्या शेतात नेले. त्या ठिकाणी एका दोरीच्या सहाय्याने तिच्या हातापायाला बांधले. यावेळी तिची आई तिला शोधत आल्यानंतर तिची सुटका झाली. या प्रकरणात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
शिरूर तालुक्यातील वडाळी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिला जवळच्या शेतात, जंगलात नेऊन हातपाय बांधून टाकण्याचा प्रकार तिसऱ्यांदा घडला आहे. यापूर्वी २७जून २०२४ आणि १७ ऑगस्ट २०२४ या दिवशीही असाच प्रकार घडला होता. परिणामी शनिवारी हा प्रकार तिसऱ्यांदा घडला असून किमान आता तरी पोलिसांनी सखोल तपास करून असा प्रकार करणारे आरोपी शोधून काढावेत, अशी मागणी मुलीच्या पालकांनी केली आहे.