Gas Cylinder Explosion : स्फोटात जीव वाचले; पण संसाराची राखरांगोळी ! file photo
बीड

Gas Cylinder Explosion : स्फोटात जीव वाचले; पण संसाराची राखरांगोळी !

गेवराईच्या संजयनगरमधील चव्हाण-राठोड कुटुंबावर सणासुदीत संकटाचा डोंगर

पुढारी वृत्तसेवा

A gas cylinder suddenly exploded while cooking in a house in Sanjay Nagar of the city

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : शहरातील संजयनगरमध्ये एका घरात स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत तिघे जण गंभीर भाजले, तर घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने तिन्ही जखमींची प्रकृती आता सुधारत असल्याने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, जीव वाचला असला तरी वर्षानुवर्षे कष्टाने उभा केलेला संसार आगीत उद्ध्वस्त झाल्याने या कुटुंबासमोर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सुवर्णा लक्ष्मण चव्हाण, जनाबाई राठोड आणि अमोल राठोड अशी जखमींची नावे आहेत. संजयनगर भागातील पत्र्याच्या घरात हे कुटुंब वास्तव्यास होते. शनिवारी रात्री सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेला.

काही क्षणांत घराला आग लागली आणि आगीने रौद्ररूप धारण केले. या दुर्घटनेत घरातील तिघे जण गंभीर भाजले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने गेवराईतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या तिघांची प्रकृती बरी असल्याची माहिती आहे.

या स्फोटाची तीव्रता एवढी होती की घरातील साहित्य, कपडे, भांडी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. एक दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. माणसांचा जीव वाचला, ही मोठी समाधानाची बाब असली तरी घरातील रोजच्या वापराच्या वस्तू जळून गेल्याने आता संसाराची गाडी पुन्हा कशी सुरू करायची, असा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे. कष्टाने जमवलेल्या वस्तू डोळ्यादेखत जळताना पाहण्याची वेळ या कुटुंबावर आली. उपचारानंतर घरी परतल्यावर आवश्यक वस्तूंपासून पुन्हा संसाराची सुरुवात करावी लागणार आहे.

नगरपरिषदेच्या पथकाची तत्परता; नागरिकांचीही धाव

घटनेची माहिती मिळताच गेवराई नगरपरिषदेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. असिशमन दलाच्या वाहनासह तीन पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे संजय कापसे, अंकुश ससाणे यांच्यासह अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशमन दलाचे अनंत धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. संजयनगर परिसरातील नागरिकांनीदेखील प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. नगरपरिषदेच्या पथकाची तत्परता आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.

मोडला जरी संसार, तरी मोडला नाही कणा !

'पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा' या कवितेतील ओळी लक्ष्मण चव्हाण यांच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडतात. आगीच्या भीषण दुर्घटनेत डोळ्यांदेखत संसार उद्ध्वस्त झाला. कष्टाने जमवलेल्या वस्तूंची राख झाली. मात्र, अशा कठीण प्रसंगातही पुन्हा उभे राहण्याचे बळ त्यांना मिळण्याची गरज आहे. लक्ष्मण चव्हाण यांची भेट घेण्यासाठी बाळराजे पवार, शिवराज पवार आणि यश पंडित आले असता, त्यांच्यासमोर आपल्या दुःखाची कहाणी सांगताना लक्ष्मण चव्हाण यांना अश्रू अनावर झाले. हुंदके देत त्यांनी आपबिती कथन केली. डोळ्यांतील अश्रू, उद्ध्वस्त झालेला संसार पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT