

गेवराई : गेवराई शहरातील संजयनगर भागात दिवाळीसाठी आणलेल्या फटाक्यांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. घरात जवळच असलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने तिघे जण गंभीर भाजले. शनिवारी (दि. ७) रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटामुळे घरातील साहित्य जळून खाक झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय एक दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सुवर्ण लक्ष्मण चव्हाण, जनाबाई राठोड आणि अमोल राठोड (रा. संजयनगर, गेवराई) अशी जखमींची नावे आहेत. संजयनगर भागात त्यांचे पत्र्याचे घर असून दिवाळीनिमित्त आणून ठेवलेल्या फटाक्यांना शनिवारी रात्री अचानक आग लागली.
आगीची तीव्रता वाढत गेल्याने घरातील जवळच असलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात घरात असलेले तिघे जण गंभीर भाजले. जखमींना गेवराईतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.