

कडा : आष्टी तालुक्यातील देवळाली- लोखंडवाडी परिसरात वाघाच्या हल्ल्यात देविदास मारिपाक टकले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने टकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी कुटुंबाला आधार देण्यासाठी आ. सुरेश धस यांनी पुढाकार घेतला असून,त्यांच्या प्रयत्नातून शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेली आणि वैयक्तिक स्वरूपातील अशी एकूण २५ लाख रुपयांची आर्थिक मदत टकले कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.
देविदास टकले यांच्या पत्नी नंदाबाई टकले तसेच त्यांची मुले कृष्णा आणि नितीन यांच्याकडे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते २० लाख रुपयांचा धनादेश आणि पाच लाख रुपयांची मदत थेट मुदतठेव (एफडी) स्वरूपात सुपूर्द करण्यात आली.यावेळी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत आमदार धस यांनी त्यांचे सांत्वन केले.
वाघाच्या हल्ल्यात कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे.आर्थिक मदतीमुळे कुटुंबीयांचे झालेले नुकसान भरून निघणार नसले, तरी या कठीण प्रसंगी त्यांना आर्थिक आधार मिळावा आणि पुढील आयुष्य जगताना काही प्रमाणात दिलासा मिळावा,या भावनेतून ही मदत देण्यात आल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
दरम्यान, देवळाली- लोखंडवाडी परिसरातील या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ आर्थिक मदत देऊन हा प्रश्न संपणार नाही,तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वनविभागाने प्रभावी पावले उचलणे गरजेचे आहे. परिसरातील नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,अशा स्पष्ट सूचना आ.सुरेश धस यांनी संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी वनविभागाचे विभागीय वन अधिकारी अमोल गरगळ,आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ शिरसाठ, उपसभापती केशर तांबडे, रुपमान तळेकर, सरपंच प्रभाकर मुळीक, सरपंच मोहन आमटे, माजी सरपंच बबन तळेकर, सरपंच पोपट शेळके, सुदर्शन मुळे, रमेश डोळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.