2 lakhs worth of goods stolen by thrown chutney in the eyes
परळी, पुढारी वृत्तसेवाः धारावती तांडा रोडवर जिम करून येणाऱ्या तरुणाच्या गाडीला धडक देऊन चाकूचा धाक दाखवून डोळ्यात चटणी टाकून २ लाख २० हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४ जणां विरुद्ध परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल कारण्यात आला. चोरट्यांकडून झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धारावती तांडा येथील यशवंत प्रेमदास पवार हे ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता हे व्यायाम करून परळीवरून धारावती तांड्याकडे मोटारसायकलवरून जात असताना, काळरात्री देवी मंदिर रोडवर एका बंद धाब्यासमोर दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी त्यांचा पाठलाग करत अचानक धडक दिली.
तोंडाला मास्क लावून त्यापैकी एकाने चाकू दाखवून धमकावले, तर दुसऱ्याने त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना धरून ठेवले. त्याच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन आणि एक तोळ्याच्या दोन अंगठ्या हिसकावून चोरटे फरार झाले. साडेतीन तोळ्यांची सोन्याची चैन १ लाख ४० हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या ८०,००० असे एकूण २ लाख २० हजार रुपयेचे किमतीचे साहित्य लुटून घेऊन पसार झाले. यशवंत प्रेमदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक मजहर सय्यद हे तपास करीत आहेत. आरोपींच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.