धडाकेबाज कारवाईत 15 ऊसतोड मजुरांची सुटका pudhari photo
बीड

Labour rescue operation : धडाकेबाज कारवाईत 15 ऊसतोड मजुरांची सुटका

विनामोबदला काम, मारहाण-धमक्यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

धारूर : धारूर तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, महसूल प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे 15 मजुरांची सुटका करण्यात आली. उत्तर प्रदेशातील मजुरांना ऊसतोडीसाठी आणून त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेत, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशाने माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले व धारूरचे नायब तहसीलदार सुरेश पाळवदे यांनी बुधवारी सायंकाळी संयुक्त धाड टाकली. विशेष पथकाने केलेल्या कारवाईत सर्व 15 मजुरांची मुक्तता करण्यात आली.

आमलाहिंगणी (बु.) येथील ओम चंद्रकांत सोळंके याने नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील मजुरांना ऊसतोडीसाठी आणल्याची माहिती आहे. काम करून घेत असताना मजुरांना मोबदला दिला जात नव्हता. उलट मजुरीची मागणी केल्यास मारहाण व धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकाराची माहिती ललितपूर प्रशासनापर्यंत पोहोचल्यावर तेथून बीड जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्र व दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने यंत्रणा हलवून कारवाईचे आदेश दिले.उपविभागीय अधिकारी इंगोले यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकात नायब तहसीलदार पाळवदे, मंडळ अधिकारी लह केदार, सोपान वाघमारे, संबंधित तलाठी व दिंद्रुड पोलिस सहभागी होते. पथकाने नियोजनबद्ध धाड टाकत मजुरांची सुटका केली.

इंगोले, पाळवदे यांची विशेष कामगिरी

विना मोबदला काम व अत्याचाराची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने तातडीने पथक तयार केले. उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले व नायब तहसीलदार सुरेश पाळवदे यांच्या नेतृत्वाखाली दिंद्रुड पोलिसांच्या मदतीने धाड टाकून सर्व मजुरांची मुक्तता करण्यात आली.मुक्त करण्यात आलेल्या मजुरांना माजलगाव तहसील कार्यालयात आणून जेवण व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. एक रात्र विश्रांती दिल्यानंतर सर्व मजुरांना विशेष वाहनाने त्यांच्या मूळ गावी (उत्तर प्रदेश) सुखरूप रवाना करण्यात आले.

या प्रकरणी ओम चंद्रकांत सोळंके याच्याविरुद्ध दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार सिद्धेश्वर डोईफोडे तपास करीत आहेत. आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT