15 child laborers rescued from Ashti taluka
बीड पुढारी वृत्तसेवा : देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, मात्र आजही वेठबिगारी ही थांबलेली दिसत नाही. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील गह-खेल येथे ९ मुली व ६ मुले हे वेठबगारीवर काम करताना उघडकीस आले. या मुलाना त्यांचे आई-वडील कोण? हेही माहीत नाही, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. बाल कल्याण समितीने गुरुवारी रात्री या मुलांची मालकाच्या तावडीतून सुटका करून त्यांना खऱ्या स्वातंत्र्याचे आयुष्य जगण्यास यानिमित्ताने सुरुवात करून दिली आहे. दरम्यान आता यातील नऊ मुली आर्वी येथील सेवाश्रमात तर सहा मुले बीड येथील निरीक्षण गृहात ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच सर्व प्रकार समोर येणार आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गहखेल या गावात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गावाजवळील लमाण ताड्यावर एक दोन वर्षाचे असल्यापासून वेट्विगारीवर काम करणाऱ्या १५ बालकांची नुकतीच सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मुले केवळ मजुरीवर काम करत नव्हती, तर त्यांना त्यांच्या स्वतः च्या आई-वडिलांनी दोन वर्षांचे असताना पैशांच्या मोबदल्यात मजूर म्हणून सोडून दिले होते. यातील दोन मुले हे मालकांनी बेदम मारहाण केल्यामुळे रात्रीतून पळून जाऊन चालत चालत थेट अहिल्यानगर येथे पोहचले.
नगरमधील औद्योगिक वसाहतीत अत्यंत दमलेल्या अवस्थेत या मुलांना पाहून त्यांना पोलिस चौकीत आणले असता येथून पुढे त्यांनी त्यांची करुण कहाणी सांगितल्यावर याचा पर्दाफाश झाला, या दोन मुलांनी त्यांच्यासारखी अजून बरीच मुले हे मालकाच्या घरी काम करत असून आम्हाला आमचे आई-वडील कोण रेसुद्धा माहीत नाही हे त्यांच्याशी बोलताना नगर बालकल्याण समितीस लक्षात आले.
दरम्यान नगर बालकल्याण समितीने या मुलांच्या सांगण्यावरून ही मुले कुठे काम करत आहेत याचा अंदाज बांधून त्या ठिकाणी पोलिस पथक, अमृतवाहिनी संस्था यांच्यासह गाव शोधून त्याठिकाणी सकाळीच धाड टाकली तर यावेळी या मुलांनी जे जे सांगितले ते सर्व त्यांच्या निदर्शनास आले.
मुलांच्या या जबाबानंतर बालकल्याण समितीने मुलांना बीड येथील आधार गृहात ठेवले असून त्यांच्या पालकांचा शोध घेणे सुरू आहे. या मुलांना पुढील शिक्षण मिळावे याकरिता त्याची व्यवस्थाही करण्यात येत असून ज्या ठिकाणाहून या मुलांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याविरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या असून ज्यांनी या मुलांचा अमानुषपणे छळ केला त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्यात येणार आहे.
८ ते १३ वयोगटातील मुले यावरून या पथकांनी या तांडावरून ९ मुली आणि सहा मुले ज्यांचे वय हे ८ ते १३ वर्षांचे वयाचे आहेत. या मुलांना ठिकाणावरून सोडवून बीड येथील जिल्हा बालकल्याण समिती समोर हजर केले. या मुलांशी समितीच्या सदस्यांनी आपुलकीने चर्चा केली असता आम्हाला आमचे आई- वडील कोण, आमची नवे हे काही माहीत नाही, आम्ही दोघे मालकाकडे पहाटे पाच वाजल्यापासून उठून काम करतोत त्यावर आम्हाला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि आणि रात्री कधीकधी खायला मिळायचे, झोपायला आम्ही फरशीवर घराच्या बाहेर झोपायचो, पायात चप्पल नाही किंवा अंगभर कपडे नाहीत, मालकाच्या पोरांचे फाटलेले कपडे आम्ही घालायचो असे सांगितले.
ही मुले गेली पाच सहा वर्षांपासून पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत अविरत राबत होती. त्यांना पुरेसे अन्न, निवारा, शिक्षण किंवा बालपण मिळालेच नाही. या मुलांमध्ये नऊ मुली आणि सहा मुले आहेत, आणि त्यांना त्यांचे आई-वडील कोण आहेत हेही ठाऊक नाही ही बाब ऐकून कोणाच्याही काळजाला चटका बसल्याशिवाय राहणार नाही. ही केवळ वेठबिगारी नाही तर ही गुलामगिरी आहे.