धारूर, पुढारी वृत्तसेवा : एका औषध विक्रेत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (सोमवार) दुपारी १२. ३० च्या सुमारास उघडकीस आला आहे. श्यामसुंदर आप्पाराव तिडके (वय ४८, रा. उदयनगर, धारूर ) असे आत्महत्या केलेल्या विक्रेत्याचे नांव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, धारूर शहरातील उदयनगर भागातील रहिवाशी असलेले शामसुंदर यांचे औषधांचे दुकान आहे. तिडके हे गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
त्यांच्या पत्नी शिक्षिका आहेत. त्या शाळेतून आज दुपारी घरी परत आल्यानंतर तिडके यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. श्यामसुंदर तिडके यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनाम्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तिडके यांच्या पत्नी एका खासगी संस्थेत सहशिक्षिका आहेत. तर दोन मुलं वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. शाम तिडके यांचा मोठा मित्र परिवार असून व्यापारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…