कळमनुरी: पुढारी वृत्तसेवा : ट्रकचे चाक तोंडावरून गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२८) दुपारी चारच्या सुमारास हिंगोली – नांदेड महामार्गावरील कळमनुरी बस स्थानकसमोर घडली. ओमकार लिंबाजी बेलखेडे (वय १६, रा. चाफनाथ, ता. कळमनुरी) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ओमकार बेलखेडे कळमनुरी शहरात आज दुपारी बाजार करण्यासाठी आला होता. यावेळी हिंगोलीकडून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत तो खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या तोंडावरून ट्रकचे मागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोनुळे, गजानन होळकर, संजय राठोड, सुनील रिठ्ठे, माधव भडके, गुलाब जाधव घटनास्थळी पोहोचले. ओमकार बेलखेडे याचा मृतदेह कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कळमनुरी पोलिसांनी पाठलाग करून ट्रक चालकास ट्रकसह ताब्यात घेतले. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
हेही वाचलंत का ?