पाथरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बाभळगाव येथे पत्राच्या घरावर उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पडून झालेल्या अपघातात ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आठ वर्षाची नात गंभीर जखमी झाली. ही घटना आज (दि. ३०) पहाटे पाचच्या सुमारास घडली.
ऊस साखर कारखान्याला घेऊन जात असताना पहाटेच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर बाभळगाव येथे आला. ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रत्याच्या बाजूला असलेल्या पत्राच्या घरावर उलटली. या घटनेची माहिती मिळताच गावकरी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताबडतोब ऊसाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पार्वतीबाई रंगनाथ पवार (वय ५५) व त्यांची आठ वर्षाची नात संजीवनी संजय जाधव यांना बाहेर काढले.परंतु, झोपेत असलेल्या पार्वती पवार यांचा उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर नात संजीवनी गंभीर जखमी झाली.
या दोघांनाही गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले गेले. यानंतर पार्वतीबाई यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या संजीवनीला पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचलंत का?