मराठवाडा

बीड : दिव्यांगांचे नववर्ष कळसूबाई शिखरावर; राज्यातील १११ दिव्यांगांचा सहभाग

अनुराधा कोरवी

बीड, पुढारी वृत्तसेवा : शिवुर्जा प्रतिष्ठान दरवर्षी धाडसी दिव्यागांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील अत्युच्च कळसूबाई शिखरावर नव वर्षाचे स्वागत करत असते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड येथील दुर्गभटके शिवुर्जा प्रतिष्ठान सचिव कचरू चांभारे यांच्या नियोजनाखाली ही मोहीम पार पडली.

यावर्षी मोहिमेचे अकरावे वर्ष होते व बीड जिल्ह्यातील सहा दिव्यांगांसह राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई, सांगली, लातूर, नांदेड, सोलापूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम, अहमदनगर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बुलढाणा, नागपूर इत्यादी जिल्ह्यातील १११ दिव्यांग सहभागी झाले होते.

३१ डिसेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व दिव्यांग बारी व जहांगीरवाडी गावातून माची मंदिरावर एकत्र आले. या ठिकाणी एकमेकांशी परिचय करून घेऊन दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष शिखराकडे चढाईला सुरुवात झाली. कळसूबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून ५४०० फूट उंचीचे आहे. खडी चढण, खोल दरीच्या बाजूने चिंचोळा रस्ता, माळरान, मोठे मोठे दगड, खडी चढण असलेल्या लोखंडी शिडी अशी विविधता असलेली ही वाट खडतर आहे.

सहभागी दिव्यांगांत २५ मुली, महिला व १५ व्यक्ती १००% अंध होते. कृत्रीम पाय असलेले तीन व एकच पाय असलेल्या दोन दिव्यांगांचा समावेश होता. रात्री सात वाजेपर्यंत सर्व दिव्यांग कळसूबाई शिखराजवळील विहिरीजवळ पोहचले. याठिकाणी कडाक्याच्या थंडीत कापडी तंबूत मुक्काम केला.

एक जानेवारी रोजी पहाटे लवकर उठून शेवटची लोखंडी शिडी सर करून कळसूबाई मातेचे दर्शन घेतले व सर्वोच्च शिखरावरून नव्या वर्षाच्या नव्या सूर्योदयाचे जल्लोषात स्वागत केले. दिव्यांग मंत्रालय निर्मितीबद्दल आ. बच्चू कडू व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.
त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता शिखर उतरणीला सुरूवात केली. ही कठीण चढाई उतरत दुपारी एक वाजता माची मंदिराजवळ सर्वजण पोहोचले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयी आनंदाची छटा होती. या धाडसी मोहिमेचा आनंद दिल्याबद्दल सर्वांनी शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे व सचिव कचरू चांभारे यांना धन्यवाद दिले. शिवुर्जाच्या उपक्रमाचे कौतुक केले. नाशिक रायडर्स ग्रूपने तर सर्व दिव्यांगावर गुलाब पाकळ्यांची उधळण करत तोफा वाजवून सहभागींचे स्वागत केले.

माची मंदिरावर सर्व दिव्यांगांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दिव्यांगांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सहा व्यक्तींना शिवुर्जा प्रतिष्ठानकडून ऊर्जा पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. अनिल बारकुल ( बीड) , पारसचंद साकला ( औरंगाबाद ), आरती लिमजे ( मुंबई), सुभाष सज्जन ( नांदेड), प्रा‌. डॉ. सोमनाथ पंचलिंग ( नांदेड), सतिश आळकुटे ( पुणे), काजल कांबळे (सांगली) यांना पुरस्कार देण्यात आला. बीड येथील कचरू चांभारे, पांडुरंग उनवणे, कल्याण घोलप, संतोष आघाव, पद्मिन तारडे, वैजनाथ देवळकर हे सहा दिव्यांग सहभागी होते.

मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवाजी गाडे पैठण, कचरू चांभारे ( बीड), अंजली प्रधान, सागर बोडखे (नाशिक), जगन्नाथ चौरे (ठाणे), डॉ. अनिल बारकुल (बीड), सतिश आळकुटे (पुणे), जीवन टोपे ( पुणे), मच्छिंद्र थोरात (शिरूर), केशव भांगरे (नगर) यांनी विशेष परिश्रम घेतले. मदतनीस म्हणून बीड येथील एकनाथ भालेकर, शिवराम पवार, अंगद उबाळे, मनोज पोपळे यांनी सहकार्य केले.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT