Yearly Horoscope 2023 : आजची रास मिथुन  : भरभराटीचे भाग्यकारक व यशाच्या शिखरावर नेणारे वर्ष | पुढारी

Yearly Horoscope 2023 : आजची रास मिथुन  : भरभराटीचे भाग्यकारक व यशाच्या शिखरावर नेणारे वर्ष

  • होराभूषण रघुवीर खटावकर 

 मिथुन ही रास वायू तत्त्वाची असून या राशीत मृग (वायू तत्त्व) आर्द्रा (जल तत्त्व) व पुनर्वसु 1,2,3 चरणे (वायू तत्त्व) अशी नक्षत्रे आहेत.

या राशीत राहू उच्च फल देतो. राहू जल व वायू तत्त्वाचा आहे. मिथुन रास बुध या राहूच्या मित्राची आहे व यात आर्द्रा हे राहूचे जल तत्त्वाचे नक्षत्र आहे. त्यामुळे राहू मिथुन राशीत उच्च फल देतो.

राहू (केतू) हे पात बिंदू आहेत. तरीही ते प्रभावशाली आहेत. राशीस्वामी मिथुन बुध आहे. बुध हा आंतरग्रह असून सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. तो सूर्यापासून कधीही 28 अंशांपेक्षा अधिक अंशदू नसतो. कोणत्याही चांगल्या तसे वाईट कृत्यासाठीही बुद्धीची जरूरी असते. बुध हेच काम करतो. चांगल्या व्यक्तींना चांगली बुद्धी देतो. त्यामुळेच रवी आणि शुक्राच्या मध्ये असलेल्या बुधाचे रवी व शुक्र दोघेही मित्र आहेत. परंतुु रवी शुक्र परस्परांचे शत्रू आहेत.

मिथुन ही पुरुष रास वायू तत्त्वाची आहे. अनेक मिथुन राशी बुद्धिमान असून बौद्धिक क्षेत्रात काम करत असतात. हे चांगले वक्ते असतात. विद्वान असतात. हजरजबाबी असतात, पण बुधाच्या कन्या या 2 राशीच्या व्यक्तींचे इतके चिकित्सक नसतात. कोट्या करण्यात यांचा हातखंडा असतो. ते चांगले मध्यास्थ असतात. कम्युनिकेशनच्या क्षेत्रात, तार व टपाल खाते रेडिओ, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर क्षेत्रात या व्यक्ती आढळून येतात. अर्थात सर्वच बौद्धिक क्षेत्रात या व्यक्ती आढळून येतात.

या वर्षी राशी स्वामी बुध धनू राशीपासून वृश्चिक राशीपर्यंतच्या 12 राशीतून भ्रमण करणार. मेष राशीत तो 31 मार्च ते 7 जूनपर्यंत तर सिंह राशीत 24 जुलै ते 1 ऑक्टोबर 2023 या काळात दीर्घकाळ असणारे आहेत.

मिथुन राशीचा भाग्यविधाता शनी वर्षभर भाग्यातच कुंभ राशीतच रहाणार आहे. त्यामुळे या व्यक्तींना सर्व प्रकारचे भाग्य लाभेल. तोटा रहाणार नाही, पण अवैध मार्गाने जाणार्‍या मिथुन राशीच्या व्यक्ती कायद्याची शिकार होऊ शकतील. बरेच प्रयत्न वाया जातील. जवळच्या व्यक्तींचा विरह सहन करावा लागेल. वडिलांशी मतभेद होतील. वडिलांच्या व भावंडांच्या प्रकृतीची काळजी राहील.
अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होणार नाहीत. शनीची द़ृष्टी लाभस्थानातील हर्षल, गुरू, राहूवर राहणार आहे. भाग्यकारक असला तरी धंदा-व्यवसायातून व सर्व प्रकारच्या व्यवहारातून अपेक्षपेक्षा कमी लाभ होतील. चांगले मित्र नसतील तर त्यांच्यामुळे त्रास होईल. मित्रांबरोबर
वाद होतील. लाभात गुरू, हर्षल, राहू आहेत. अनेक प्रकारे अचानक लाभ होतील. शैक्षणिक बाबतीत वरच्या श्रेणीत रहाल. इच्छापूर्तीच्या या स्थानातील गुरू कितीही अडचणी आल्या तरी तो तुमची इच्छा पूर्ण करण्यास समर्थ राहील. श्रेष्ठत्व प्राप्त करून देईल.

धनलाभ, वस्त्रलाभ, मित्रलाभ, विषय सुख, प्रॉपर्टी संतती लाभ, विवाह, बढती सर्व सर्व लाभ प्रयत्नांनी, बुद्धिकौशल्याने मिळवू शकाल. गुरू हर्षल यांच्या आगळ्यावेगळ्या मैत्रीमुळे कोणतेही लाभ आपल्या हातातून जाऊ शकणार नाही; मात्र अर्थप्राप्तीचा वैध मार्ग निवडला पाहिजे व चांगले मित्र जोडले पाहिजेत. हे तुमच्या हातात राहील. समाजाभिमुख व्हाल. नातेवाईकांसाठी त्याग कराल.

मिथुन राशी व्यक्तींना रवीचे मीन-मेष राशीतून (मार्च-एप्रिल, एप्रिल-मे) सिंह राशीतून (ऑगस्ट-सप्टेंबर), वृश्चिक राशीतून (नोव्हेंबर-डिसेंबर) होणारे भ्रमण यशाची खात्री देणारे आहे. मिथुन राशी व्यक्तींना कन्या (सप्टेंबर-ऑक्टोबर), मकर (जानेवारी-फेब्रुवारी) व वृषभ (मे-जून) या राशीतील या वर्षीचे रवीचे भ्रमण घरगृहस्थीची, धंदा-व्यवसायाची चिंता लावणारे राहू शकेल. मिथुन राशीला शुक्र पंचमेश उत्तम असला तरी त्याचे वृश्चिक धनू (डिसे 23) मीन (फेबु्र.-मार्च) राशीतील भ्रमण दुर्लक्ष झाल्यास धंद्यात अडचणी निर्माण करणारे व भावनिक दडपण निर्माण करणारे राहू शकेल.

मंगळाचे सिंह (जुलै-ऑगस्ट) मधील वृश्चिकेतील (नोव्हें.-डिसें 23) व कर्केतील (मे-जून23) मधील भ्रमणात जोखमीची कामे करताना सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक राहील. यावर्षी 17 जानेवारी 2023 रोजी कुंभेत येणारा शनी मिथुन सुवर्णपादाने येत असून काही प्रमाणात चिंता लावणारा आहे. शनी पुढील अडीच वर्षे कुंभ राशीत राहील. यावर्षी 18 फेब्रुवारी 2023 रोजी मीन राशीत येणारा नेपच्यून मिथुन व्यक्तीसाठी लोहपादाने येणारा असून धंदा व्यवसायातील कष्ट वाढविणारा आहे. नेपच्यून तुमच्या राशीच्या दशमस्थानी पुढील 14 वर्षे राहणार आहे.

या वर्षी 21 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत येणारा गुरू मिथुन व्यक्तींसाठी सुवर्णपादाने येत असून चिंता लावणारा आहे. गुरू वर्षभर तुमच्या राशीच्या लाभस्थानी रहाणार आहे. आर्थिक प्राप्तीसाठी अवैध मार्गाचा अवलंब करू नका. एकंदरीत पाहता हे वर्ष मिथुन व्यक्तींसाठी अत्यंत भरभराटीचे, भाग्यकारक व यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे आहे. गुरू मेष मध्ये येईपर्यंतच्या काळात म्हणजे एप्रिल 2023 पर्यंत मिथुन व्यक्तींनी प्रयत्नपूर्वक आपल्या कामाच्या गुणवत्तेत वाढ करणे मात्र आवश्यक आहे. राहू 28 नोव्हेंबरपर्यंत लाभात आहे. प्लुटो अष्टमस्थानी आहे. कर्म स्थानाच्या लाभात असल्यामुळे गुप्त मार्गाने धन मिळवण्याचा प्रयत्न राहील.

Back to top button