गोव्यात पर्यटकांची लूट; अबब… कळंगुटला फ्राईड राईस ९५० तर लॉबस्टर थाळी ४,५०० रुपये | पुढारी

गोव्यात पर्यटकांची लूट; अबब... कळंगुटला फ्राईड राईस ९५० तर लॉबस्टर थाळी ४,५०० रुपये

पणजी : पुढारी वृत्तसेवा: एकीकडे पर्यटन खाते पर्यटनातील अवैध धंद्यांवर कारवाई करत आहे. मात्र, दुसरीकडे किनारी भागातील शॅकमध्ये पर्यटकांची लूट सुरूच आहे. कळंगुट येथील एका रॉकमध्ये फ्राईड राईसची किंमत तब्बल ९५० रुपये तर लॉबस्टर थाळीची किंमत ४,५०० रुपये इतकी वाढीव आहे. तसेच मद्य व अन्य खाद्यपदार्थांचे दरही तिप्पट होते. हंगामात थोडी दरवाढ ठीक आहे; मात्र अशा पद्धतीने लूट केल्यास पर्यटक पुन्हा येथे येतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेले काही दिवस उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट, बागा किनारी असणाऱ्या शॅकमधील दर गगनाला भिडले आहेत. १५० रुपयांना मिळणारे चिकन चिली, गोबी मंच्युरिअन ५०० ते ६०० रुपयांना विकण्यात आले. साधारण १३० रुपयांपर्यंत मिळणारे व्हेज सेझवान राईसची किंमत ९९० रुपये होती. मिक्स पुलाव ९००, दहीभात ४५०, पनीर भाजी ५५० रुपयांना विकली जात होती. याशिवाय अस्सल गोमंतकीय माशांचे जेवणही सामान्य ग्राहकाला परवडणारे नव्हते. इसवण थाळीचा दर ३ ते ३५०० हजर रुपये होता.

मुंबईतील एका पर्यटकाने सांगितले की, गोवा पर्यटन राज्य असल्याने हंगामात दरवाढ करणे ठीक आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. या व्यवसायवर अवलंबुन असणाऱ्या लोकांना आधार मिळतो. मी देशभर फिरलो आहे, पण एवढी दरवाढ योग्य वाटत नाही. येथे टॅक्सी चालकांची मुजोरीही पाहायला मिळाली. असेच सुरु राहिले तर एक दिवस पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील.

दारूचे दर तिप्पट

•१६० रुपयांना मिळणारी १८० मिली सिनेचर व्हिस्की ७५०
• ७५ रुपयांना मिळणारी आयबी ५४० रुपये
•१६० ची ब्लेंडर्स प्राईड ७५० रुपये
• ७५ रुपयांची किंगफिशर बीअर २०० रुपये

Back to top button