Maharashtra Accident News Pudhari
महाराष्ट्र

Maharashtra Accident News: महाराष्ट्र हादरला! एकाच दिवशी चार भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी, कुठे घडल्या घटना?

Maharashtra Road Accidents: महाराष्ट्रात एका दिवसात रायगड, धुळे, जुन्नर आणि वारूळ येथे चार भीषण अपघात घडून किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Road Accidents: महाराष्ट्रात अपघातांच्या मालिकेने मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील विविध भागांत एकाच दिवशी चार भीषण अपघात घडल्याने किमान 18 जणांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रायगड, धुळे, जुन्नर आणि कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झालेल्या या दुर्घटनांमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही अपघातांमध्ये संपूर्ण कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, काही ठिकाणी निष्काळजीपणा आणि वेग हे कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

1. आंबेनळी घाटात काळाचा घाला; 8 तरुणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात सर्वात भीषण अपघात घडला. पर्यटकांची स्कॉर्पिओ कार सुमारे 700 ते 1000 फूट खोल दरीत कोसळली, ज्यात सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

हे सर्वजण कोकणात फिरून परतत होते. मात्र घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. या घटनेने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

2. धुळ्यात लळिंग घाटात तिहेरी अपघात; 6 जणांचा मृत्यू

दुसरी भीषण घटना धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात पहाटेच्या सुमारास घडली. येथे सुरुवातीला डंपर आणि ट्रकची धडक झाली होती. या अपघातानंतर मदतीसाठी थांबलेल्या टोल कर्मचाऱ्यांसह काहीजण घटनास्थळी होते.

मात्र त्याचवेळी एक भरधाव ट्रॅव्हल्स बस नियंत्रण सुटून थेट त्या वाहनांवर आणि तिथे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर धडकली. या तिहेरी अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 26 जण जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

3. जुन्नरमध्ये एसटीची दुचाकीला धडक; चौघांचा मृत्यू

तिसरी दुर्घटना अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर परिसरात घडली. येथे एसटी बसने एका दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यात दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

4. वारूळ येथे ट्रक-कारची धडक; 6 जण गंभीर

दरम्यान, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वारूळ येथे ट्रक आणि आर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सातारा जिल्ह्यातील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रक ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात वाढते अपघात

एकाच दिवशी राज्यात चार मोठे अपघात घडल्याने रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेग, निष्काळजीपणा, घाटरस्त्यांवरील धोके आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घटनांनंतर मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT