

बंगळूर : क्रूझर व ट्रक यांची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि. 23 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लाडलापूर (ता. चित्तापूर, जि. गुलबर्गा) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५० वर घडली.
मोहम्मद हुसेन शहा (६०), फातिमा अली (३८), रसूल बी. (४०), मेहबूब अली व क्रूझर चालक तोलूसाब पाशा (२४, सर्व रा. इंगळगी, ता. चित्तापूर) अशी मृतांची नावे आहेत. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद अब्दुलसाब नामक व्यक्तीला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना तातडीने यादगीर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आठजण क्रूझरमधून गेले होते.
दरम्यान रात्री 12 च्या सुमारास मोहम्मद यांना रुग्णालयात दाखल करून ते क्रुझरने परत येत असताना लाडलापूरजवळील महामार्गावर हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, या कुटुंबातील पाच सदस्य जागीच मृत पावले. यामध्ये क्रूझर चालकासह ५ जणांचा मृत्यू झाला. तर बाकी तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची वाडी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.