Maharashtra Local Body election result 2025: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलांचे संकेत मिळू लागले आहेत. प्राथमिक मतमोजणीत सत्ताधारी महायुतीने जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, महायुती सुमारे 50 नगरपालिकांमध्ये आघाडीवर असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतांची गणना सर्वप्रथम केली जाते. या मतांमध्ये प्रामुख्याने शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेले मतदार सहभागी असतात. त्यामुळे पोस्टल मतमोजणी ही अंतिम निकालाची दिशा ठरवणारी मानली जाते. याच मतमोजणीत महायुतीला सुरुवातीपासूनच आघाडी मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
प्राथमिक कलानुसार, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश असलेल्या महायुतीला अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागात महायुतीचे उमेदवार पोस्टल मतांमध्ये आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सत्ताधारी गटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांकडूनही प्रत्यक्ष ईव्हीएम मतमोजणीमध्ये चित्र बदलू शकते. स्थानिक प्रश्न, उमेदवारांची व्यक्तिगत मतदारसंघात पकड आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील समीकरणे यामुळे काही ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. अनेक ठिकाणी विजयी मिरवणूक, फटाके किंवा बॅनरबाजीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.