Maharashtra Legislative Council Election: राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी पार पडणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने या मतदारसंघांतील अनेक जागा रिक्त होत्या. संबंधित आमदारांचा कार्यकाळ संपूनही नव्या निवडणुका घेता आल्या नव्हत्या. त्यामुळे तब्बल दोन ते अडीच वर्षांपासून विधान परिषदेतील काही जागा रिक्तच राहिल्या होत्या. आता या निवडणुकांमुळे त्या जागा भरल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्यांची निवड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून केली जाते. मात्र, निवडणूक घेण्यासाठी संबंधित मतदारसंघात किमान 75 टक्के मतदारसंख्या अस्तित्वात असणे आवश्यक असते. ही अट पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, 25 मे रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल.
उमेदवारी मागे घेण्यासाठी 4 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. तर 22 जून रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये या निवडणुका होणार आहेत. यामध्ये पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, सांगली-सातारा, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि इतर काही मतदारसंघांचा समावेश आहे.
या निवडणुकांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू होण्याची चिन्हे आधीच दिसू लागली आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद हे राज्यातील उच्च सभागृह मानलं जातं. येथे एकूण 78 सदस्य असतात. या सदस्यांची निवड वेगवेगळ्या गटांतून केली जाते.
यामध्ये 30 सदस्यांची निवड आमदारांकडून केली जाते. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. याशिवाय 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून आणि 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. उर्वरित 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
विधान परिषद निवडणुकीच्या घोषणेमुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, विविध पक्षांमध्ये उमेदवारीवरून चुरस वाढण्याची शक्यता आहे.