Maharashtra Cabinet Decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामांतरापासून शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टला जमीन आणि नागपूर बाह्य वळण रस्त्यासाठी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्यापर्यंत अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
कोकण रेल्वेचे शिल्पकार मानले जाणारे ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता या स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
कोकणातील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारने 2026 मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेतला आहे. यासाठी ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005’ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव, सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मंदिर ट्रस्टकडून वापरात असलेल्या या जमिनीचा वापर नियमित करण्यात येणार असून, नाममात्र दरात ही जमीन ट्रस्टला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर परिसराच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
नवीन नागपूर आणि नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी आवश्यक जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
हिंगणा तालुक्यातील गोदणी आणि लाडगाव (रीठी) येथील खाजगी जमीन थेट वाटाघाटीद्वारे खरेदी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रिया जलद होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे कोकण रेल्वे नामकरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासोबतच कर्मचारी, धार्मिक संस्था आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.