मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोर पकडला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, पावसाची रिपरिप सुरू आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. बुधवारी मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यानंतर शुक्रवारपर्यंत पावसाचा जोर किंचित कमी होईल, पण शनिवारपासून तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी गुरुवार ते रविवारपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे. नदीकिनारी, डोंगराळ भागात आणि सखल ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व सरकारी यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या मुसळधार पावसाचा थेट परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तिथे पावसाचा जोर वाढल्याने नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. कणकवली-आचरा राज्य मार्गावर वरवडे गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. यामुळे श्रावण, रामगड, आचरा, बेळणे आणि मालवण या गावांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.