देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लाईफलाईन म्हणून लोकल ट्रेन ओळखली जाते. सध्याच्या स्मार्टफोनच्या जगात मुंबई लोकल असो किंवा कोणताही प्रवास असो स्मार्टफोन हा सर्वात उत्तम विरंगुळा असतो. हा स्मार्टफोनच चाकरमान्यांना कुटुंब, काम आणि जगाशी जोडतो. मात्र याच स्मार्टफोनवर लोकल ट्रेनमध्ये डल्ला मारण्याचे प्रकार मागील काही काळापासून वाढले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये चोरांच्या अनेक टोळ्या सक्रिय असून या टोळ्या दररोज 18 ते 20 महागडे मोबाईल लंपास करतात.
2022 पासून आतापर्यंत, सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी), मुंबई येथे फोन चोरीचे 37 हजार 398 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्यापैकी फक्त 16 हजार 154 प्रकरणांमध्ये हरवलेले मोबाईल सापडले आहेत. सामान्यतः गर्दीच्या गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर मोबाईल चोरीला जातात. केवळ 2023 मध्ये 12 हजार 989 फोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. 2023 च्या तुलनेत आता मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
चौरीच्या एकूण घटनांपैकी बर्याच घटना चोरांच्या छोट्या टोळ्यांमार्फत घडतात. या टोळ्या एकत्र काम करतात. आम्ही अलीकडेच अशा एका टोळीच्या सदस्याला पकडले आहे. जेव्हा टोळीतील असा एखादा सदस्य पकडला जातो, तेव्हा अशी चोरीची प्रकरणे क्षणार्धात कमी होतात. कारण हे लोक दिवसातून अनेक फोन चोरतात, असे रेल्वे पोलीस गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
मुंबई लोकल ट्रेनमधून दर दिवशी साधारणपणे 18 ते 20 महागडे मोबाईल चोरीला जातात. म्हणजेच दर आठवड्याला सरासरी 135 ते 140 फोन चोरीला जातात. याचा अर्थ दर महिन्याला लोकल ट्रेनमध्ये चोरीला जाणार्या मोबाईलची संख्या ही 950 च्या आसपास आहे.
जीआरपीच्या आकडेवारीनुसार, बहुतेक चोरीच्या घटनांमध्ये कुर्ला स्थानक आघाडीवर आहे. कुर्ल्याबरोबरच कल्याण स्थानकामध्येही मोबाईल चोरीचे प्रमाण इतर स्थानकांपेक्षा अधिक आहे. विरोधाभास म्हणजे सर्वाधिक पोलीस बंदोबस्त असलेल्या स्थानकांमध्ये कल्याण आणि कुर्ल्याचा समावेश असतानाही तिथेच मोबाईलच्या सर्वाधिक चोर्या होतात.
बहुतेकांना ट्रेनमधून उतरल्यानंतरच त्यांचा फोन हरवल्याचे लक्षात येते. त्यामुळे चोरी कुठे झाली हे नेमके ठिकाण शोधणे कठीण होते. पीडित व्यक्तीला फोन हरवल्याचे लक्षात आल्यावर आम्ही स्टेशनवर एफआयआर नोंदवतो आणि तिथून तपास करतो, असे पोलीस सांगतात. जर एखाद्याच्या समोर फोन हिसकावून घेतला असेल, तर आम्ही सीसीटीव्ही फुटेज त्वरित पाहू शकतो आणि गुन्हेगाराची ओळख पटवू शकतो, असेही पोलिसांनी सांगितले.