कोल्हापूर सुनील सकटे: हवामान खात्याचा पावसाचा अंदाज चुकल्याने जिल्ह्यातील धरणांतील पाण्याचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी कटकसरीने वापरत पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्याची कसरत पाटबंधारे विभागास करावी लागत आहे. पावसाचा अंदाज गृहीत धरून केटीवेअरमधील बरगे काढल्याने पाण्याचा प्रवाह सतत सुरू आहे. राधानगरी धरणात सध्या केवळ २३ टक्केच पाणीसाठा आहे.
यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होईल, पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याच्या अनुमानानुसार पाटबंधारे विभाग धरणातील पाण्याचे नियोजन करीत असते. यंदा मान्सूनचे लवकर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला. २० ते २५ मे पासून पावसास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने केटीवेअरमधील लाकडी बरगे काढण्यास सुरू केले. सर्वच केटीवेअरमधील बरगे काढल्याने आता पाण्याचा प्रवाह अविरत सुरू आहे. त्यामुळे नदी प्रवाहित राहण्यासाठी धरणातून पाणी सोडणे आवश्यक आहे. अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यातच धरणांतील पाणीसाठा कमी होत आहे. नदी कायम प्रवाहित राहिल्याने पाटबंधारे विभागासमोर पाणीसाठ्याचे मोठे आव्हान आहे.
पाऊस वेळेत आला नाही, तर जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. सध्या राधानगरी धरणात २९ टक्के म्हणजे २.४२ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा केवळ पाच दशलक्ष घनफूट जादा पाणीसाठा आहे. तुळशी धरणात दीड टीएमसी पाणी आहे. वारणा धरणात सुमारे ११ टीएमसी पाणी आहे. काळम्मावाडी धरणात ६.६१ टीएमसी तसेच कुंभी आणि पाटगाव धरणांत केवळ एक टीएमसी पाणी आहे. उर्वरित छोट्या धरणांत एक टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस लांबल्याने धरणांतील पाणीसाठा ही चिंतेची बाब बनली आहे. पाऊस आणखी लांबल्?यास पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
गतवर्षीपेक्षा यंदा तुळशी धरणात आठ दशलक्ष घनफूट पाणी कमी आहे. वारणा धरणात २५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा कमी आहे. दूधगंगा म्हणजे काळम्मावाडी धरणात तब्बल ८६ दशलक्ष घनफूट पाणी कमी झाले आहे. केवळ राधानगरी धरणात गतवर्षीपेक्षा यंदा केवळ पाच दशलक्ष घनफूट पाणी जास्त आहे. म्हणजे २.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
हेही वाचा