कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शिवाजी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील वसतिगृह 3 मार्चपासून सुरू करावेत. याबाबतचे पत्र पुणे विभाग उच्च शिक्षण सहसंचालकांनी विद्यापीठास पाठवले आहे. त्याअनुषंगाने वसतिगृह सुरू करण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे.
सध्या महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. महाविद्यालये, विद्यापीठातील वसतिगृह सुरू नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वसतिगृह सुरू करण्याची विद्यार्थी, पालकांमधून मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.
विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे 276 महाविद्यालये असून 2 लाख 50 हजार विद्यार्थी आहेत. विद्यापीठात 41 अधिविभाग आहेत. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील अनुदानित 133 महाविद्यालयांत 91 व शिवाजी विद्यापीठात 10 वसतिगृहे आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान अधिविभागाची वसतिगृहे जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहेत. नुकतीच वसतिगृह अधीक्षकांची बैठक झाली. विद्यापीठाकडून वसतिगृह सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना मागविण्यात आल्या आहेत. लसीचे दोन डोस पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्राधान्याने प्रवेश असणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ वसतिगृहाचे चिफ रेक्टर डॉ. एस. पी. हंगिरगेकर यांनी दिली.
उच्च शिक्षण संचालनालयाने शासकीय महाविद्यालये व संस्थेतील वसतिगृह सुरू करताना स्थानिक जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांनी दोन दिवसांपूर्वी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार ईबीसी वसतिगृह कोल्हापूर, बुधगाव (सांगली), राजाराम महाविद्यालयातील दोन वसतिगृह, पाटण (सातारा) मुलींचे प्रियदर्शनी वसतिगृह सुरू होणार आहे.
– डॉ. हेमंत कठरे, विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक